पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९०
भारतीय लोकसत्ता

पडत ते केवळ त्यांच्या पद्धतीमुळे. मदुरा, कुंभकोणम् येथील व्याख्यानांत त्यांनी हा विचार स्पष्टपणे मांडला आहे. 'सुधारकांनाहि झेपणार नाहीं इतकी सुधारणा व्हावी अशा मताचा मी आहे. पण तसे करतांना स्वकीयांचा तेजोभंग केला तर कांहीं साधणार नाहीं. गेल्या शंभर वर्षात सुधारकांना कांहींच फल मिळालें नाहीं, याचें कारण हेंच कीं, त्यांनी अतिरिक्त आत्मनिर्भर्त्सना केली. असला तेजोभंग करून कार्यभाग होत नसतो,' अस त्यांचे मत होते.
 पुष्कळ वेळां आगरकरांनीं जी भाषा वापरली तीच किंवा तिच्यापेक्षांहि जास्त कडक भाषा विवेकानंदांनी वापरली आहे; पण एक एका अर्वाचीन संस्थेचे प्रिन्सिपल होते तर दुसरे प्राचीन पद्धतीचे संन्यासी होते. स्वामींचा संन्यास हा भौतिकवादाच्या कडू औषधी गोळ्यांना अनुपानासारखा उपयोगी पडला. 'आपल्यापुढील कार्य' या भाषणांत ते म्हणतात, 'आपणच सर्वात श्रेष्ठ आहो, आपण जगाचे त्राते आहो हा भ्रम सोडून द्या. आपल्या पूर्वजांविषयीं मला निःसीम आदर असूनहि मी तुम्हांस सांगतों कीं आपणांस इतर राष्ट्रांपासून खूपच शिकवावयाचे आहे. (आरंभीच्या व्याख्यानांत थोडे शिकावयाचे आहे असे ते म्हणत.) कोणाच्याहि पायांपाशी बसण्याची आपली सिद्धता असली पाहिजे. आपण दुसऱ्यास शिकविण्यास समर्थ आहो हे विसरूं नये. पण जगाशी आपल्याला कांहीं कर्तव्य नाहीं, हा समज मूर्खपणाचा आहे. त्या समजामुळेच आपण गेलीं हजार वर्षे गुलामगिरीचे प्रायश्चित्त भोगीत आह' (पृ. २७२). नव्या शास्त्रीय ज्ञानांतून कोठले तरी सिद्धान्त घेऊन आपल्या जुन्या रूढींचें, लोकभ्रमांचें व कर्मकांडांचे वेडगळ समर्थन करण्याची पद्धत स्वामींच्या वेळी थोडी थोडी सुरू झाली होती. या प्रकाराची त्यांना अत्यंत चीड असे. त्याचा निषेध करून ते म्हणतात, "अशा तऱ्हेने जुन्या लोकभ्रमांचे समर्थन करणें हें अत्यंत लज्जास्पद होय. असे भोळसट होण्यापेक्षां तुम्ही कट्टर नास्तिक झाला तरी चालेल. कारण नास्तिक मनुष्य खरा जिवंत मनुष्य असतो. व त्याच्या मनाला वळण लावण्याची शक्यता तरी असते. निरीश्वरवादांत एकप्रकारचे सामर्थ्य आहे, एकप्रकारची रग आहे. अंधश्रद्धा, भोळसटपणा हा मात्र मृत्यु होय. म्हणून कुजट रूढींच्या समर्थनापेक्षां