पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भारतीय लोकसत्ता

आपला विकास व विस्तार करता आला तसा प्रजासत्तेला प्रत्यक्ष पद्धतीमुळें आला नाहीं. थोर व समर्थ राजांनी आपल्या राज्याचे साम्राज्य केले आणि त्यांतील अशोक, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त यासारख्या सम्राटांनी आपल्या राज्याच्या मर्यादा अखिल भारतापर्यंत नेऊन भिडविल्या. प्रजातंत्रांना हे कधींहि साधलें नाहीं, त्यांचा व्याप अत्यंत अल्प असाच राहिला. एकदोन जिल्ह्यापलीकडे त्यांच्या सत्तेचा व्याप कधीं वाढूं शकला नाहीं आणि त्यामुळेच पुढील काळांत साम्राज्यांच्या विशाल सत्तेपुढे त्यांना टिकाव धरतां आला नाही; तरी अल्प प्रमाणावर का होईना पण भारतांत मागल्या काळीं लोकसत्ताक राज्य सामर्थ्य व समृद्धि निर्माण करण्यांत यशस्वी झाली होती, ही गोष्ट अतिशय भूषणावह आहे, हें आपण विसरता कामा नये.

ग्रामीण स्वराज्य

 प्राचीन काळच्या लोकायत्त शासनाचा एक उल्लेखनीय विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायती हा होय. लोकशासन त्या काळीं फक्त नगरांतूनच दिसून येत होते असे नव्हे तर खेड्यापर्यंत ही स्वयंशासनाची कल्पना पसरली होती आणि दृढमूल झाली होती. मागल्याकाळीं स्थानिक स्वराज्यसंस्था लोकसत्ताक राज्यांत तर होत्याच पण जेथे एकतंत्री राजशासन चालू होतें, अशा प्रदेशांतहि खेड्यांचा कारभार स्वायत्तपद्धतीनेच चालत असे. वर उल्लेखिलेलीं सर्व प्रजासत्ताक राज्ये उत्तर हिंदुस्थानांत होतीं. दक्षिण हिंदुस्थानांत लिच्छवी, वृष्णि, यौधेय यांच्याप्रमाणे एकहि प्रजातंत्र असल्याचा पुरावा मिळत नाहीं; पण असे असले तरी दक्षिण हिंदुस्थानांत त्याकाळी सुद्धां ग्रामपंचायती स्वायत्तपणे कारभार करीत असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. गंगपल्लव, चालुक्य यांच्या राजवटीतील अनेक शिलालेख सांपडले आहेत. त्यांत या ग्रामसंस्थांच्या कारभाराचा अनेक वेळां निर्देश व वर्णनहि आढळते. प्रा. द. के. केळकर यांनी उत्तरमल्लूर व उक्कल येथील शिलालेख उतरून दिले आहेत. त्यांवरून त्या वेळीं ग्रामसंस्थांच्या सभा कशा भरत, उद्यानें, तलाव, मंदिरे यांची व्यवस्था सर्वानुमते कशी चाले याविषयीं स्पष्ट कल्पना येते आणि या ग्रामसंस्थांच्या स्वायत्ततेबद्दल शंका रहात नाहीं.