पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

विचारांत घेता येत नसे. सारांश इतर बाबतींत प्राचीन प्रजातंत्रांचे स्वरूप सध्यांच्या लोकसत्तापेक्षां निराळे असले तरी सभेच्या कामकाजाचे स्वरूप व त्याचे नियम बरेचसे सध्यांच्या सारखेच असत असें दिसतें.

सामर्थ्य व समृद्धि

 महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र इ. प्राचीन ग्रंथांत लोकसत्ताक शासनाचा उपहास केलेला आढळतो. या पद्धतींत सर्वच स्वतःला शहाणे- बरोबरीचे समजत असल्यामुळे कोणी कोणाच्या आज्ञा पाळीत नाहीं व त्यामुळे शेवटीं कलह, दुही, फूट या रोगांनीं समाज दुबळा होऊन जातो, असा या ग्रंथांतील टीकेचा भावार्थ आहे. प्रजातंत्राचे हे मूलभूत दोष आहेत हे सर्वमान्यच आहे आणि आपली प्राचीन प्रजातंत्रे पुढील काळांत विलयास गेलीं त्याचें, कांहीं पंडितांच्या मते, हेच कारण आहे. या प्रजातंत्रांना समाज संघटित ठेवतां आला नाही. त्यामुळेच त्यांचा नाश झाला; पण असे असले तरी ज्या हजार एक वर्षांच्या काळांत या प्रजातंत्रांचा उदय व उत्कर्ष झाला, त्या काळांत आपापल्या परीने का होईना ती चांगलीच बलाढ्य व सामर्थ्यशाली होती, हेहि या पंडितांनी प्रांजळपणे नमूद करून ठेविले आहे. क्षुद्रक- मालव या लोकायत्त संघाच्या सामर्थ्याचे ग्रीक ग्रंथकारांनींच वर्णन केले आहे. या संघाजवळ एक लाख जय्यत सैन्य होते आणि अशा बलाढ्य सेनेस तोंड देण्यास शिकंदराचे शिपाई तयार होईनात म्हणून त्याला शेवटी त्यांच्याशीं तह करावा लागला. अग्रश्रेणी व अंबष्ठ या दोन प्रजासत्ताक राज्यांचे लढाऊ सामर्थ्य असेच मोठे होते. अग्रश्रेणीजवळ चाळीस हजार पायदळ व तीन हजार घोडदळ आणि अंबष्ठाजवळ ६० हजार पायदळ, ६ हजार घोडदळ व पांचशें रथ अशा सेना होत्या. अशा तऱ्हेचे लष्करी बळ उभविण्याची सिद्धता असल्यामुळे हीं राज्ये धनधान्य- संपत्तीनेहि समृद्ध अशीं होतीं. म्हणजे या दृष्टीनेहि, राजसत्तेच्या तुलनेने विचार करतां, हीं प्रजातंत्र अपयशी झाली असे म्हणतां येणार नाहीं. भारतांत प्राचीन काळीं अगदीं लहानलहान ज्या राजसत्ता होत्या, त्यांची शौर्य व संपन्नता या बाबतींत या प्रजातंत्रांहून जास्त चांगली स्थिति होती असे मुळींच म्हणतां येणार नाहीं. फरक येवढाच दिसतो कीं, राजसत्तेला पुढे फार मोठ्या प्रमाणावर