पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८८
भारतीय लोकसत्ता

देशांनी जग बाहुबलाने जिंकले. आपण तें वाणीच्या बलाने जिंकलें, अध्यात्म तेजाने जिंकले. प्रत्येक देशाला कांहीं विशिष्ट असे जीवितकार्य असतें. धर्म हें भारताचे कार्य आहे. राजकीय साम्राज्ये व आर्थिक साम्राज्ये आम्हीं स्थापलीं नाहींत. तो आमचा हेतूच नव्हता. अध्यात्म ही भारताची जगाला देणगी आहे. जगांत असा एकहि धर्म नाहीं कीं, जो कोणत्याना कोणत्या बाबतीत हिंदुधर्मांचा ऋणी नाहीं. आमच्या कांहीं रूढि चुकल्या म्हणून आमच्यावर कोणी टीका करतात; पण काल परवांच्या उपटसुंब राष्ट्रांनी आम्हांला उपदेश करणे हे हास्यास्पद आहे. त्यांना म्हणावें प्रथम दीर्घकाल टिकणाऱ्या रूढी निर्माण करा व मग आम्हांस शिकवावयास या. अध्यात्म, त्याग, संन्यास हें आमचें ध्येय आहे. जग हें मायामय असून त्यांतून मोक्ष मिळविणे हे आमचे अंतिम प्राप्तव्य आहे. शास्त्रज्ञान, सत्ता, संपत्ति, कीर्ति या सर्वांना त्यापुढे गौण स्थान आहे. ही आध्यात्मिकता हा आमच्या राष्ट्राचा कणा आहे. आणि तिचा सर्व जगाला उपदेश करून जडवादापासून त्याला मुक्त करणे हे आमचे कार्य आहे. तो आमचा अधिकारहि आहे. (स्वामी विवेकानंद समय ग्रंथ खंड २ रा. प्रबुद्ध भारत कचेरी १९१८ पृ. १०६-३२ )

परंपरेंतून क्रान्तीकडे

 अशा तऱ्हेच्या दिव्य संदेशाने विवेकानंदांनी प्रथम भारतीय समाजाचा आत्मविश्वास जागृत केला, त्याच्या स्वत्वाला उजाळा दिला व त्याच्या राष्ट्रीय अहंकारावर आलेली काजळी झाडून टाकून त्याला पुन्हां प्रदीप्त केला आणि आतां कठोर टीकेने त्याचें मन हाय खाणार नाहीं अशी खात्री होतांच त्यांनी आपले धोरण हळूहळू पालटण्यास सुरवात केली.
 'जगाला अध्यात्म शिकविणे हे आपले कार्य आहे, तो आपला अधिकार आहे हे खरे; पण आपल्याला जगापासून कांहींच शिकावयाचे नाहीं काय ? तसें नाहीं. आपल्यालाहि थोडे शिकण्याजोगे आहे. थोडे भौतिक ज्ञान, संघटन कौशल्य, सत्ता खेळविण्याचे सामर्थ्य हे गुण आपण पाश्चात्यांपासून घेतले पाहिजेत.' असे सांगण्यास त्यांनीं प्रारंभ केला. मदुरा येथील व्याख्यानांत श्रोत्यांना त्यांनी तशी जाणीवहि दिली. 'आपले राष्ट्र