पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८७
भौतिक अधिष्ठान

 १५ जानेवारी १८९७ रोजी पश्चिमेतून परत येऊन स्वामीजींनी कोलंबोच्या भूमीवर पुन्हा पाय ठेवला; पण त्यापूर्वीच त्यांची कीर्ति दाही दिशांना पसरून भरतभूमींत येऊन पोचली होती. १८९३ सालीं विवेकानंदांचे जगद्धर्मपरिषदेत व्याख्यान झाले आणि त्याक्षणीच त्यांनीं पश्चिमेवर अपूर्व विजय मिळवून आपल्या मायभूमीच्या पराभूत मनावरील मालिन्य नष्ट करून तिच्या अंगीं चैतन्याचा संचार घडवून आणला. ती व्याख्यानाची घडी अमृत घडीच होती. कारण ज्या पाश्चात्यांच्या पायापाशीं सुद्धां बसण्याची आपली लायकी नाहीं, असें भारतीय समाजाला वाटत होते तेच पाश्चात्य त्याच समाजाच्या पायाशी बसून 'शिष्यस्तेऽहम् शाधि मां त्वां प्रपन्नम्' अशा भावनेने याचना करूं लागले होते. अमेरिकेने अगदी प्रांजळ मनाने 'अलौकिक धर्मवेत्ता,' 'श्रीख्रिस्ताचा अवतार,' 'अध्यात्माचा प्रदीप' असा स्वामींचा गौरव करून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आणि त्यापेक्षाहि विशेष म्हणजे शेकडो अमेरिकन स्त्रीपुरुष रामकृष्णमठाचे सदस्य होऊन स्वामीजींचे शिष्य बनले. 'ज्या भूमींत असला अलौकिक धर्मवेत्ता पुरुष निर्माण होतो, तिच्याकडे धर्मप्रसारासाठी आपण आपले मिशनरी धाडणें हा मूर्खपणा आहे हे आतां तरी अमेरिकनांच्या ध्यानीं येईल काय ?' असें अमेरिकन वर्तमानपत्रे विचारू लागली.
 स्वामी विवेकानंदांनी मिळविलेला हा विजय शिकंदर किंवा नेपोलियन यांच्या विजयापेक्षां अनेकपटीने श्रेष्ठ होता. त्या विजयाच्या जाणिवेनें एक पराभूत, निराशाग्रस्त, मृतकल्प राष्ट्र संजीविनी दिल्याप्रमाणे सजीव झालें. त्याचा राष्ट्रीय अहंकार जागृत झाला. आत्मप्रत्ययाचें दिव्य स्फुरण त्याच्या चित्तांत झाले, त्याच्या इतिहासांतील युगायुगाची रात्र संपून नव्या युगाच्या उषेची दिव्यप्रभा त्याच्या मुखावर दिसूं लागली आणि अशा स्थितींत स्वामीजी आपल्या अमेरिकन शिष्यपरिवारासह कोलंबोला जेव्हां उतरले तेव्हां तर या राष्ट्राला सूर्योदय झाल्याचाच भास झाला. अशा या भूमिकेवरून स्वामीजींनी आपल्या कार्याला प्रारंभ केला.
 'आपण पूर्वी जगताचे गुरु होतों. जगताला अध्यात्मज्ञान देण्याचे कार्य अनेक युगें आपण केलें आहे. आणि पुढेहि आपण तेच करणार आहों' स्वामीजींची वाणी भारताच्या नभोमंडलांत घुमूं लागली. 'इतर