पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८६
भारतीय लोकसत्ता


हितावह प्रतिक्रिया

 वर सांगितलेच आहे कीं, पाश्चात्यांच्या भौतिकवादाचा जो प्रसार येथे होत होता त्याच्याविरुद्ध त्या काळी येथे प्रतिक्रिया होणे अवश्य होते. ती प्रतिक्रिया घडवून आणण्यास स्वामी विवेकानंदासारख्या विभूतीचा भरतभूमित जन्म झाला हे आपले भाग्य होय. दुसऱ्या एखाद्या कट्टर सनातन्याच्या हातून हे कार्य झाले असते तर त्याने ती लाट दुसऱ्या ध्रुवापर्यंत खेचून पुन्हां दुसऱ्या उलट्या प्रतिक्रियेची तयारी करून ठेवली असती. आणि मग त्या क्रियाप्रतिक्रियांच्या हेलकाव्यापायीं भरतभूमि हैराण होऊन गेली असती. पण तसे घडले नाहीं. याला कारण स्वामीजींची प्रज्ञा, त्यांची दिव्यदृष्टि, त्यांची अलौकिक समयज्ञता हेंच होय.भारताचा तेजोभंग झाला आहे, तो पराभूत झाला आहे, त्याचा आत्मप्रत्यय ढळण्याचा क्षण आला आहे हे त्यांनी जाणलें होतें. आणि या रोगावर स्वाभिमान जागृति, पूर्वजांच्या वैभवाचे दर्शन, परंपरेच्या दिव्य तेजाची प्रतीति, हीच संजीवनी होय असा त्यांचा बुद्धिनिश्चय तर होताच; पण त्याबरोबरच भौतिकवाद हा हितावह आहे, पाश्चात्य सुधारणा या मारक नसून त्या तारकच आहेत, त्यांचा स्वीकार हा अपरिहार्य आहे हेहि सत्य त्यांनी आकळिले होते आणि म्हणूनच आपला संदेश आपल्या राष्ट्राला देत असतांना त्यांनीं हें अनुसंधान कधींच सुटू दिले नाहीं. आरंभी प्राचीन इतिहासाच्या मुक्तकंठ प्रशंसेने, परंपरेच्या उज्ज्वल वर्णनानें व उपनिषद्धर्माच्या पुनरुज्जीवनाने त्यांनी स्वकीय समाजाला विश्वासांत घेतले, त्याचे मन उल्हसित केले, त्याच्या मनाला नवजीवन दिले आणि नंतर त्याचा आत्मप्रत्यय ढळण्याची भीति नष्ट होतांच त्यांनी त्याच्या खऱ्या अवस्थेचें त्याला ज्ञान करून देऊन थोड्याफार फरकाने त्याला आगरकरांच्या तत्त्वज्ञानावरच आणून ठेवले. आपल्या समाजाला भौतिक अधिष्ठान प्राप्त करून देऊन त्याचे शासन धर्मनिरपेक्ष करण्यांत आणि त्यामुळे येथली लोकसत्ता दृढमूल करून टाकण्यांत जे अल्पस्वल्प यश आपल्याला येत आहे, त्याचें बरेंचसें श्रेय स्वामी विवेकानंदांच्या अलौकिक दिव्यप्रज्ञेला दिले पाहिजे. स्वामीजींची 'कोलंबो अल्मोरा व्याख्यानमाला' पाहिली म्हणजे हा चमत्कार त्यांनी कसा घडवून आणला ते आपल्या ध्यानीं येईल.