पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८५
भौतिक अधिष्ठान

इतर क्षेत्रांतहि तीच गत झाली होती. पाश्चात्यांचे विज्ञान, त्यांचे यंत्रशास्त्र, त्यांचे अर्थशास्त्र, त्यांचें इतिहासपांडित्य व त्यांचा दिग्विजय यांमुळे केवळ शरीरानेच नव्हे तर मनानेंहि भारतीय जनता पराभूत व मृतकल्प झाली होती. आपली धर्मव्यवस्था, समाजरचना, आपले नीतिशास्त्र, आपले विज्ञान, आपले अर्थशास्त्र - एवंच आपले सर्व राष्ट्रीय जीवनच अगदीं हीन आहे. आपण पूर्वीहि श्रेष्ठ नव्हतो. आज तर नाहींच आणि पुढेहि कधींकाळीं आपल्याला श्रेष्ठ पदवी मिळण्याची आशा नाहीं अशा तऱ्हेचे निराशेचे विचार भारतीय मनाला गांजून सोडीत होते. आणि त्यामुळे या समाजाचा आत्मप्रत्ययच ढळतो कीं काय अशी भीति विचारवेत्त्यांना वाटू लागली होती. येथें जी प्रतिक्रिया झाली ती या भीतींतून निर्माण झाली होती.
 वैयक्तिक जीवनांत आत्मप्रत्यय ढळतांच मनुष्य आत्महत्येला प्रवृत्त होतो. राष्ट्रीय जीवनांत प्रत्यक्ष शारीर आत्महत्या झाली नाहीं तरी संपूर्ण शरणागतीच्या रूपाने राष्ट्र आत्महत्या करीत असते. गेल्या शतकाच्या तिसऱ्या चरणांत भारतीय समाजाच्या आयुष्यांत तसा भयानक क्षण येण्याचा संभव निर्माण झाला होता. रोगग्रस्त माणसाच्या जीवनांत असे प्रसंग पुष्कळ वेळां येतात. त्या वेळी वैद्यकीय मताने त्याच्या शरीरांत कसलेंहि त्राण उरले नसलें तरी त्याला तसे सांगणे धोक्याचें असतें. वस्तुस्थितीचे ज्ञान त्यावेळी घातकच ठरते. अशा वेळीं तुला कांहींहि झालेलें नाहीं, कांहीं लहानशी विकृति आहे ती तेव्हांच नाहींशी होईल, असा धीर देण्यानेच तो मनुष्य रोगमुक्त होऊन चांगला सशक्त व सुदृढ होईल. तसे झाल्यावर त्याच्या भावी आरोग्याच्या दृष्टीने त्याला त्याच्या रोगाचे यथार्थ ज्ञान करून देणें अवश्य ठरेल. पण प्रत्यक्ष रोगग्रस्त असतांना ते ज्ञान कधीहि हितावह ठरणार नाहीं. भरतभूमीची त्या वेळीं अशा मरणोन्मुख माणसाप्रमाणेच स्थिति झाली होती तिला आगरकरांचे तत्त्वज्ञान त्या वेळीं कोठल्याच अनुपानाशिवाय देणे घातक ठरलें असतें. तिला त्या स्थितींत स्वामी विवेकानंदासारखा कुशल धन्वंतरीच हवा होता.