पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८३
भौतिक अधिष्ठान

तत्त्वावर अधिष्ठिलेली असते. माझ्या विचाराइतकाच दुसऱ्याचा विचार, माझ्या मताइतकेंच दुसऱ्याचें मत सत्य असू शकेल व त्याला तें मत सांगण्याचा माझ्याइतकाच, किंबहुना जगांतल्या इतर कोणच्याहि श्रेष्ठ पुरुषाइतकाच हक्क आहे, म्हणजेच त्याला विचारस्वातंत्र्य आहे, हे तत्त्व म्हणजे लोकशाहीचा प्राण होय. अध्यात्मशास्त्रांत अतींद्रियज्ञान संपन्न पुरुषांइतका अधिकार दुसऱ्या कोणाचाहि नसतो आणि त्यांनी सांगितलेल्या सिद्धांताइतका दुसरा विरोधी सिद्धांतहि खरा असूं शकेल ही कल्पना त्या शास्त्राला असह्य आहे. म्हणजे मानवाची मूलभूत समता व नवीन सत्य- संशोधनाचा अवसर हे लोकशाही घटक अध्यात्माला मंजूरच नाहींत आणि म्हणूनच अध्यात्माच्या, पारलौकिक धर्माच्या वर्चस्वाखाली लोकसत्ता वाढ कधींच शक्य नाहीं. अध्यात्माला पोप, शंकराचार्य, खलिफा, मनु यावांचून गति नाहीं व यांचे अधिकार मानणे हे लोकशाहीला कधींच मानवणार नाहीं. अध्यात्मवर्चस्व व लोकसत्ता यांचा असा हा मूलभूत विरोध आहे आणि म्हणूनच लोकसत्तेचें शासन धर्मनिरपेक्ष असणें अवश्य आहें. बुद्धि- प्रामाण्याच्या प्रसारावांचून असे शासन निर्माण करणे व तें टिकविणें अशक्य आहे. म्हणून लोकशाहीला त्याची फार आवश्यकता आहे. आगरकरांनी नेमके तेच कार्य केलें म्हणून त्यांची महती विशेष.
 आज आगरकरांचे तत्त्वज्ञान आपण सर्वांशीं नाहीं तरी बव्हंशीं आत्मसात् केले आहे आणि त्याअन्वये समाजरचना करण्याची ईर्षा धरली आहे; पण त्यांच्या काळी म्हणजे सुमारे साठ वर्षांपूर्वी समाजाने त्याचें मुळींच स्वागत केले नव्हते, इतकेंच नव्हे तर समाजाला ते अत्यंत तिरस्करणीय व त्याज्य असेंच वाटत होतें. परमेश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्मसिद्धांत, वर्णाश्रमव्यवस्था, परंपरेचा अंध अभिमान व कुटुंबांतील अधिकारश्रेणी हे पांच घटक म्हणजे हिंदुसमाजाचे पंचप्राण होते आणि त्यांवरच आगरकरांनीं टीकास्त्र चालविले होतें. मनुष्यतेचे ऐहिक सुखसंवर्धन हा एकच धर्म ते मानीत असत आणि पाश्चात्य पंडितांच्या आधारे शुद्ध विवेकनिष्ठेने त्याचें प्रतिपादन करीत असत. त्यांना आपल्या भारतीय पूर्वजांचा अगदीं प्रखर असा अभिमान असला तरी 'सध्यांच्या काळीं त्यांच्या विद्या, त्यांचे ग्रंथ, त्यांचे तत्त्वज्ञान आपणांस उपयोगी पडण्याजोगे नसून आपण आतां पाश्चात्य सुधारणांचा