पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८२
भारतीय लोकसत्ता

होर्णे शक्य नव्हतें. कारण या पूर्वसूरींची धर्मनिष्ठा अचल होती. त्यांचे सर्व प्रयत्न धर्माचे स्वरूप उज्ज्वल करावे या हेतूने चालले होते. धर्माच्या सर्वव्यापी सत्तेचा उच्छेद करावा असा त्यांचा प्रयत्न नव्हता व हेतुहि नव्हता. इतकेच नव्हे तर त्याला त्यांचा तीव्र विरोध होता. न्या. रानडे, डॉ. भांडारकर यांना तर भौतिकवादाचा संताप येत असे. आणि म्हणूनच आपण हे ध्यानांत घेतले पाहिजे की, त्या सर्व सुधारकांच्या बुद्धिप्रामाण्याचा व्याप फार मर्यादित होता. भौतिकवादांतील एका तत्त्वाचा त्यांनी कांहींसा अंगीकार केला होता इतकेंच. आगरकरांच्या प्रतिपादनाचा आत्माच भौतिकवाद होता. त्यांना समाजाचें धर्म हें अधिष्ठानच बदलून टाकावयाचे होते. ऐहिक व्यवहारवरील जी आध्यात्मिक मतप्रणालींची सत्ता तीच आम्हांस बाधक झाली आहे, असा त्यांचा बुद्धिनिश्चय होता आणि त्या दृष्टीने त्यांनी बुद्धिप्रामाण्याचें प्रतिपादन चालविले होते. धर्मनिरपेक्ष लोकायत्त शासनाला तेच तत्त्वज्ञान अवश्य होते; राममोहन किंवा रानडे यांच्या बुद्धिप्रामाण्याने हें कार्य झाले नसते, कारण त्यांचे अधिष्ठान जुनेच होते. ते अधिष्ठान बदलून टाकावें हें आगरकरांचे तत्त्वज्ञान होते आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची महती जास्त ठरते.

अंतर्ज्ञान व लोकसत्ता

 आगरकरांनीं पुरस्कारिलेल्या भौतिकाधिष्ठित बुद्धिप्रामाण्याचा लोकसत्तेशी किती घन संबंध आहे, तें पाश्चात्य पंडितांनी इतर अनेक देशांतील लोकसत्तांविषयीं जीं विवेचनें केलीं आहेत. त्यावरून सहज ध्यानांत येईल. पारलौकिक धर्माचा मुख्य आधार म्हणजे अतींद्रिय ज्ञान, अंतर्ज्ञान हा होय. इतिहास, अनुभव, तर्क, प्रयोग हीं सर्व तेथें गौण होत. बुद्धि व पंचज्ञानेंद्रिये याहून एक निराळी ज्ञानशक्ति मनुष्याला असते हें पारलौकिक धर्मात, अध्यात्मशास्त्रांत गृहीत धरलेले आहे आणि लोकशाहीला हेंच तत्त्व अत्यंत मारक असें ठरते. कारण अध्यात्मशास्त्रांत त्या अतींद्रिय ज्ञानशक्तीनें संपन्न असा जो पुरुष त्याचें वचन प्रमाण धरलेले असते. त्याला स्फुरेल तें सत्य. त्यापुढे दुसऱ्या कोणी शंका घेणें हेहि अधर्म्य आणि त्याने सांगितलेले तेंच एकमेव सत्य असे मानणे हा धर्म होय. लोकसत्ता बरोबर याच्या उलट