पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८१
भौतिक अधिष्ठान

तळमळीनें केले आहे, ते आपल्या ध्यानी येईल तर भारतीय लोकसत्ता त्यांची किती ऋणी आहे, ते आपणांस कळून येईल.

मूलगामी बुद्धिवाद

 वरील तत्त्वांमध्ये बुद्धिप्रामाण्याचें जें तत्त्व आहे ते आगरकरांनीं प्रथम सांगितले असे नव्हे. राजा राममोहन हे बुद्धिप्रामाण्यवादीच होते. त्यांचा ब्राह्मसमाज व महाराष्ट्रांतील प्रार्थनासमाज हे वेद किंवा इतर कोणचाहि तत्सम ग्रंथ ईश्वरप्रणीत मानीत नाहीत; त्याचप्रमाणे दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, रानडे, भांडारकर हे त्या काळचे सुधारकहिं बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करीत; पण त्यांच्या बुद्धिवादाचा प्रभाव आगरकरांच्या बुद्धिवादासारखा पडूं शकला नाहीं. याचे कारण हेंच कीं, जुन्या धर्माधिष्ठानावर उभे राहून त्यांनीं या नव्या तत्त्वाचा स्वीकार केला होता. या विषयीं 'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथांत आचार्य जावडेकरांनी केलेले विवेचन उद्बोधक होईल. ते म्हणतात, 'धर्मांची सर्वव्यापी सत्ता नष्ट करून राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवहाराची स्वतंत्र पृथक् शास्त्रे निर्माण करणे आणि धर्माकडे केवळ अंतरंग सुधारणेचे किंवा आत्मिक उन्नतीचे कार्य ठेवणें हें एक आधुनिक युरोपीय संस्कृतीचे लक्षण आहे. आधुनिक युरोपीय सुधारणेत सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवहारांची धर्माशी फारकत केलेली आहे. इतकेच नव्हे तर नीतिशास्त्राचाहि धर्मांशीं व अध्यात्माशीं कांहीं संबंध नाहीं असे प्रतिपादण्यांत येत आहे. ही विचारसरणी आज आपल्या समाजांतहि रूढ होऊ पहात आहे. परंतु राजा राममोहन रॉय यांच्या वेळच्या हिंदुसमाजाची तशी स्थिति नव्हती. त्या वेळचा हिंदुसमाज हा मध्ययुगीन युरोपीय समाजासारखा होता. त्याच्या सर्व व्यवहारावर धर्मांची सत्ता अप्रतिहत नसली तरी तत्त्वतः चालत होती व ती तशी चालावी हेंच साहजिक व इष्ट आहे, अशी त्या वेळीं हिंदी समाजाची कल्पना व श्रद्धा होती.' (पृ. ६२)
 यावरून हे ध्यानांत येईल कीं, आगरकरांच्या पूर्वीच्या सर्व सुधारकांनी बुद्धिप्रामाण्य जरी स्वीकारले होते, तरी त्याची खरी प्रखरता त्यावेळीं भासमान
 भा. लो....६