पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८०
भारतीय लोकसत्ता

आनंदमय होऊन एकप्रकारें ज्याचे देहावसान सुटते असा एखादा महात्माच आईबापांची, गणगोतांची, धनद्रव्याची, जातीची, देशाची किंबहुना समग्र मनुष्यतेची पर्वा न ठेवतां अन्तरोत्थित अमर्याद प्रेरणाबलाच्या भरवशावर हवे तेवढे महत्कृत्य हातीं घेऊन तडीस नेतो.' (वरील ग्रंथ पृ. २०७)
 भौतिक शास्त्राधिष्ठित समाजरचनेचीं कांहीं प्रधान तत्त्वें वर सांगितलीं. पण तेवढीच सांगून आगरकर थांबत नाहींत. सामाजिक व वैयक्तिक संबंधांच्या अगदी बारीक तपशिलांतहि ते शिरतात व या नव्या तत्त्वांच्या अवलंबनाने तेथे कोणचीं परिवर्तने होतील व होणे अवश्य आहे तेहि ते दाखवितात. पितापुत्रांचें, पतिपत्नींचें, सासूसुनेचे नाते नव्या समाजरचनेत आमूलाग्र बदलून गेलें पाहिजे असे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. मुलांनी आईबापाशीं कृतज्ञतेने वागावें, त्यास दुःख देऊं नये, त्यांची सेवा करावी हें युक्तच आहे; पण स्वतः प्रौढ झाल्यावर सामाजिक, धार्मिक वा राजकीय बाबतीत त्यांच्या आज्ञा सतत पाळीत रहाणे हें समाजाला घातक होईल, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. प्रगति व्हावयाची तर जुन्या व नव्या पिढीचा कलह होणें अवश्यच आहे, तो जेथे होत नसतो तेथे सर्व प्रगति खुंटलेली असते, हैं प्रतिपादन त्यांनी केले आहे. पुरुषाच्या व्यक्तित्वाइतकीच त्यांना स्त्रीच्या व्यक्तित्वाची महती वाटत होती. म्हणूनच विवाहाच्या बाबतींत स्वयंवर, प्रियाराधन, वल्लभोपासना हीं रूढ करावीं आणि लग्न झाल्यावर मुलीने आईबापांचे घर सोडून एकदम नवऱ्याच्या स्वतंत्र संसाराचे आधिपत्य पतकरावे व अशा रीतीनें सासुरवासाचे घोडे मुळींच नाहीसें करावे, असा उपदेश त्यांनी केला आहे. (निबंधसंग्रह भाग १ ला पृ. २२९)
 शासनसंस्था ही धर्मनिरपेक्ष व्हावयाची तर समाजाच्या अगदीं अंगोपांगांत आमूलाग्र परिवर्तन होणे अवश्य आहे हें आगरकरांनी किती सूक्ष्मपणे जाणलें होतें तें वरील उताऱ्यावरून आपल्या ध्यानांत येईल. तीं सर्व अंगोपांगें-धर्मसंस्था, नीतिसंस्था, कुटुम्बसंस्था, आणि त्यांत अंतर्भूत असलेल्या व्यक्तींचे परस्परसंबंध या सर्वाचेच अधिष्ठान बदलले पाहिजे आणि त्यांना नवें विज्ञानाचे, बुद्धिवादाचे अधिष्ठान दिले पाहिजे, हे तत्त्वज्ञान सांगणे हें आगरकराचें जीवितकार्य होते. ते त्यानीं किती उत्कटत्वानें व