पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९
भौतिक अधिष्ठान

अगदी असह्य होतील; पण हेच विचार राष्ट्राच्या समृद्धीला व म्हणूनच लोकशासनाला पायाभूत होत असतात, जाणून ते सांगितल्याबद्दल आपण आगरकरांना शतशः धन्यवाद दिले पाहिजेत.

महातत्त्व

 व्यक्तिस्वातंत्र्य किंवा बुद्धिप्रमाण्य हें विज्ञानाधिष्ठित समाजाचें मूलमहातत्त्व होय. त्याचा तर आपल्या लेखनांत आगरकरांनी उच्च स्वराने सारखा उद्घोष चालविला होता. 'सुधारक काढण्याचा हेतु' या सुधारकांतील पहिल्याच लेखांत त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ते म्हणतात, 'ज्या तत्त्वांचें अवलंबन केल्याने इतर राष्ट्र अधिकाधिक सुधारत चालली आहेत, तीं तत्त्वे हा सुधारक महाराष्ट्र लोकांपुढे वारंवार आणील. तसें करण्यास त्यास, आज ज्याचा जारीनें अंमल चालत आहे त्या लोकमता विरुद्ध बरेंच जावे लागणार असल्यामुळे, बराच त्रास पडणार आहे. पण त्याची तो पर्वा करीत नाहीं. कारण ज्या लोकमताचा पुष्कळांस बाऊ वाटतो त्याचा बऱ्याच बाबतींत आदर करण्यापेक्षां अनादर करणे हाच श्लाध्यतर मार्ग होय.'
 'मनुपाराशरादिकांचे प्रामाण्य आम्ही मानीत नाहीं' हे सांगतांना अत्यंत आवेशाने त्यांनी पुढील घोष केला आहे 'एकाद्या दुसऱ्या मनूची आणि पाराशराची कथा काय ? आमच्या अर्वाचीन विचारास ज्या धार्मिक व सामाजिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत त्यांस शेंकडों मनूंचे व सहस्रावधि पाराशरांचे आधार दाखविलेत तरी ज्याप्रमाणे पर्वताच्या माथ्यावरील सरोवराच्या भिंती फोडून तुफान वेगांनें कड्यावरून पडूं लागलेल्या वारिवाहाची गति कुंठित करण्यास कोणीहि धजत नाहीं, त्याप्रमाणे आमच्या मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक समजुतीस लागलेला वणवा कोट्यवधि अजागळ कीटकांच्या क्षुद्र पक्षवाताने किंवा मोठ्या किड्यांच्या शुष्क श्वासवातानें विझण्याचा मुळींच संभव नाहीं. उलट तेच त्यांत होरपळले जाण्याचा संभव आहे.' (निबंधसंग्रह भाग १ ला पृ. १४५) बुद्धिस्वातंत्र्याच्या आनंदाचे तर एका ठिकाणी त्यांनीं ब्रह्मानंदासारखे वर्णन केले आहे.' बुद्धिमंदिरांत सत्याचा दीप प्रकाशित झाल्याबरोबर वृत्ति