पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
भारतीय लोकसत्ता

जाणार हा विचार जेव्हां रूढ होतो तेव्हां मानवाच्या सर्व कर्तृवाचा झराच आटून जातो. 'आपण स्ववश नसून कालवश आहों ' हा विचार मानवी पराक्रमाला अत्यंत बाधक आहे. हाच विचार, हेंच तत्त्वज्ञान ब्रिटिशांपूर्वी शेंकडों वर्षे येथे रूढ होते. आगकरांनी ते उलथून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सुखभोगाचे महत्त्व

 युरोपच्या प्रगतीस कारणीभूत झालेले भौतिकवादांतील तिसरे तत्त्व म्हणजे, माणसानें पराक्रम करून अधिकाधिक सुखोपभोग मिळविण्याचा प्रयत्न करावा, त्यांत अनुचित असे कांहीं नसून ते त्याचे कर्तव्यच आहे, ते त्याला भूषणच आहे हे होय. वेदान्ती, संन्यासमार्गी, पारलौकिकधर्मनिष्ठ पंडित सुखभोगांचा नेहमी तिरस्कार करतात व त्यांचा त्याग करण्यास सांगतात. हे भोग मानवाच्या मोक्षमार्गाच्या आड येतात असे सर्व धर्माचे मत आहे. पण हें मत रूढ होतांच मानवाचें पौरुष खच्ची होते व तो इहलोकीचे वैभव गमावून बसतो, हे पौर्वात्य राष्ट्रांच्या अर्वाचीन काळच्या इतिहासावरून स्वच्छ दिसून येते. हा अनर्थ टाळावयाचा असेल तर समान भौतिकशास्त्राधिष्ठित होऊन सुखभोगाकडे मानवाची प्रवृत्ति होणे अवश्य आहे. हें जाणूनच आगरकरांनीं हें तत्त्व प्रतिपादिले आहे. 'भातभाकरीवर कसातरी जीव राखावा व दोन जाडेभरडे कपडे घालून शरीर झांकावें या पलीकडे आमच्या लोकांची सुखोपभोगाची कल्पना जातच नाहीं' या विषयीं खेद प्रदर्शित करून आगरकर पुढे म्हणतात, 'आपल्यामध्ये स्वसुखोपभोगाची ही जी हेळसांड माजली आहे ती अत्यंत दूषणीय आहे, इतकेंच नव्हे तर ती देशाला शारीरिक व मानसिक दारिद्र्य येण्याचे आदिकारण होय. (उक्तग्रंथ पृ. १२२) ऐहिक सुखाकडे या दृष्टीने पहाण्याची प्रवृत्ति असल्यामुळेंच आगरकरांनीं पुढील उद्गार काढले आहेत. 'तीव्र भूक व विषयवासना यांस उत्तम रीतीने भागवितां आल्यास जे समाधान होतें तें अद्वितीय व अवर्णनीय आहे, हे सत्यप्रिय व विचारी मनुष्यास कबूल केलें पाहिजे' (पृ. १४४) ऐहिक सुखाची व त्यांतल्यात्यांत विषयसुखाची उठल्याबसल्या निंदा करण्यास चटावलेल्या वेदान्तप्रवण मनुष्यास हे उद्गार