पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
भारतीय लोकसत्ता

आगरकरांना देण्यांत येते ते याच कारणानें. (निबंधसंग्रह भाग १ ला पृ. २८-२९ भाग २ रा पृ. १०-३०)

पूर्णावस्था पुढे आहे

 भौतिकाधिष्ठित किंवा विज्ञानप्रणीत समाजरचनेचा दुसरा सिद्धांत हा मनुष्यजातीच्या पूर्णावस्थेविषयीं आहे. ब्रिटिश लोकसत्तेचा अभ्यास करणारांना हे माहीतच आहे की मानवसमाजाची उत्तरोत्तर प्रगति होत आहे हा विचार इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या अखेरीस जर्मीं वेथाम याने रूढ केला आणि त्यामुळेच समाजांत चैतन्य निर्माण होऊन इंग्लंडचा उत्कर्ष झाला. या विचाराने मिळणाऱ्या प्रबल प्रेरणेवांचून मानवाला पराक्रम करणे शक्यच नाही. इंग्लंडमध्ये जॉनसनच्या काळापर्यंत प्रगतीचा सिद्धांत फारसा कोणाला मान्य नव्हता, आणि हजारों वर्षे जगाची तीच स्थिति होती. मनु, कानफ्यूशियस इ. धर्मवेत्यांचे समाजाला स्थिरावस्था आणण्याचेच प्रयत्न असत आणि त्यांत ते यशस्वी झालेले होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे समाजाला फार प्राचीनकाळी पूर्णावस्था येऊन गेलेली आहे व तेथून उत्तरोत्तर त्याचा ऱ्हासच होत आहे. सत्य, त्रेता, द्वापर व कली ही आपली युगकल्पना याच तत्त्वज्ञानांतली आहे. तिच्याअन्वयें पुढील काळांत समाजाची प्रगति होणे शक्यच नाहीं. उत्तरोत्तर कालक्रमानें अपरिहार्यपणे त्याचा ऱ्हासच होत जाणार. या कल्पना ज्या समाजांत दृढमूल झालेल्या असतात त्याचा उत्कर्ष होणे किती कठीण आहे हे सहन ध्यानांत येण्यासारखे आहे. कांहीं केलें तरी प्रगति अशक्य आहे अशी मनुष्याची खात्री झाली तर तो उद्योगाला प्रवृत्त होणार नाहीं. त्याच्या मनांत उत्साह व मनगटांत बळ येणार नाहीं. अशीं माणसे दैववादी बनून प्रवाहपतित होऊन बसतात. भारतीय समाजाला ब्रिटिशांच्या पूर्वकाळी हीच अवस्था प्राप्त झाली होती. अशा समाजाची उन्नति होणे अशक्य आहे. आणि तेथे लोकसत्ता तर क्षणभरही टिकणार नाहीं. लोकसत्ता ही गतिशीलतेवर दृढ श्रद्धा असणाऱ्या लोकांनाच यशस्वी करतां येते. स्थिरावस्थेच्या पुरस्कर्त्यांना नाहीं.
 ही गतिशीलता आपल्या समाजांत निर्माण करण्यासाठी आगरकरांनी फार प्रयत्न केले आहेत. 'आमच्या अल्पसमजुतीप्रमाणे मनुष्याची पूर्णावस्था