पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५
भौतिक अधिष्ठान

ऐहिक सुख पाहिजे असेल त्यांनी राजनीति, पदार्थविज्ञान, नीतिप्रसार, विद्योत्तेजन यंत्र कलाप्रसार व धनसंचय या विषयांकडे आपले तनमनधन लावावे.' याच निबंधांत अन्यत्र त्यांनी म्हटले आहे कीं, 'ऐहिक व पारमार्थिक सुखाचे विषय व ते संपादण्याची साधने अगदीं भिन्न असल्यामुळे एकमेकांचें एकमेकांशीं बहुधा पटत नाहीं, किंवा तीं परस्पराला उपरोधक असतात असे म्हटले तरी चालेल.' हा विचार सांगून, ऐहिक उन्नतीसाठींहि घर्माची आवश्यकता आहे, असे आग्रहाने प्रतिपादन करणारे जे न्या. मू. रानडे त्यांच्यावर आगरकरांनी कडक टीका केली आहे.
 या स्पष्ट प्रतिपादनांपेक्षांहि आगरकरांनीं आपल्या धर्मकल्पना, देवदेवता, पुराणें व त्यांतील रूढी यांची ऐतिहासिक पद्धतीनें जी चिकित्सा केली आहे तिच्यामुळे रूढ पारमार्थिक धर्मकल्पनांना मोठा हादरा बसून समाजप्रवृत्ति विवेकप्रधान करून टाकण्याकडे फारच उपयोग झालेला आहे. 'देवतांच्या कल्पना पिशाच्चापासून निर्माण झालेल्या आहेत.' 'अनादि कालापासून मनुष्यास ईशशक्तीचें ज्ञान आहे असें जें अनेक श्रद्धाळूंचे फार जुने म्हणणें आहे ते साधार नाहीं.' हे व असले त्यांनी सांगितलेले विचार आज सर्वमान्य झाले आहेत; आणि म्हणूनच आज आपली आहे इतकी तरी प्रगति शक्य झाली. भौतिकशास्त्राधिष्ठित समाजाचे मुख्य लक्षण हें कीं, त्याची सर्व नियमने, बंधने, त्यांतील सर्व विधिनिषेध, त्याचे उत्कर्षापकर्षाचे सिद्धांत हे सर्व अनुभव, इतिहास, तर्क, प्रयोग, विवेक यांवर आधारलेले असतात, अतींद्रिय साधनांनीं प्राप्त झालेले ज्ञान हिशेबांत धरून या समाजाला वळण लावण्याचा प्रयत्न कोणीहि करीत नाहीं. त्याचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, युद्धशास्त्र, शिक्षणशास्त्र, सर्व कांहीं अनुभवप्रमाणगम्य असें असतें. अर्थात् समाजाच्या मनावरील अतींद्रियधर्मांचे वर्चस्व नष्ट झाल्याखेरीज समाज असलीं अनुभवगम्य बंधने मानण्यास व त्याचा आदर करण्यास कधींच सिद्ध होणार नाहीं हें सांगण्याचीं जरूर नाहीं. हे वर्चस्व नष्ट होण्यास जुन्या धार्मिक रूढींचीं, आचारविचारांची आणि गृहीत सिद्धांतांची ऐतिहासिक पद्धतीने केलेली चिकित्सा पुष्कळच कारणीभूत होते. आगरकरांनी अनेक निबंधांत ही चिकित्सा अगदी कठोर अशा शास्त्रीय दृष्टीने केली आहे. आपल्या समाजाची आज जी कांहीं शास्त्रप्रवण प्रवृत्ति झाली आहे तिचें श्रेय