पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय लोकसत्ता

हे धर्माधिष्ठित समाज धर्मनिरपेक्ष लोकायत्त शासनाच्या अंकित रहावे अशी इच्छा असेल तर त्यांचे धर्म हे अधिष्ठान बदलून त्यांच्यावरची धर्माची सत्ता नष्ट करून त्यांना भौतिक शास्त्राधिष्ठित केले पाहिजे. आणि हे धोरण त्यांच्या एकाददुसऱ्या अंगाविषयीं न अवलंबिता त्यांच्या सर्व अंगोपांगांच्या बाबतीत त्याचा पुरस्कार केला पाहिजे. येथले राजकारण, समाजकारण, येथली नीतिव्यवस्था येथले वैयक्तिक संबंध, कौटुंबिक संबंध, स्त्रीपुरुषांचें वैवाहिक संबंध, येथले शैक्षणिक धोरण, त्यांतील गुरुशिष्य संबंध- सर्व सर्व भौतिकशास्त्राधिष्ठितच असले पाहिजे. असे केले तरच शासन धर्मनिरपेक्ष करण्यांत यश येऊन अंतीं लोकसत्ता दृढ व अभंग होते. आपल्या शास्त्यानीं धर्मनिरपेक्ष शासनाची घोषणा केली तेव्हां तिला या भूमींत जवळजवळ मुळींच विरोध झाला नाहीं आणि त्या तत्त्वान्यये शासन चालविण्यांत त्यांना कांहीं यशहि प्राप्त झाले आहे. या यशाचे पुष्कळसे श्रेय प्रथम केसरीचे व नंतर सुधारक पत्राचे संपादक असलेले भरतभूमीचे थोर सुपुत्र गोपाळ गणेश आगरकर यांना व त्यांनी प्रसृत केलेल्या विवेकनिष्ठ विचारप्रणालीला आहे. भौतिकाधिष्ठित समाजरचनेचे बहुतेक सर्व सिद्धान्त आगरकरांच्या या विचारप्रणालींत समाविष्ट झालेले आहेत.

विज्ञानप्रणीत समाजरचना

 आगरकर हे स्वतः अज्ञेयवादी होते. 'ईशस्वरूप आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियास अगम्य आहे, हा धर्मसंबंधींचा शेवटचा सिद्धांत आहे' असे त्यांनी 'आमचे काय होणार' या निबंधांत सांगून टाकले आहे. आणि या अनुरोधानेच ते समाजशास्त्रीय तत्त्वांचें विवेचन करीत. 'आम्हां मनुष्यांना पाहिजे काय व ते मिळेल कशाने ?' या आपल्या निबंधांत ऐहिक अभिवृद्धीला, मानवाच्या इहलोकींच्या उन्नतीला (पारलौकिक) धर्मांची मुळींच आवश्यकता नाहीं असें त्यांनी निःसंदिग्धपणे प्रतिपादिले आहे. ते म्हणतात, 'ग्रीस व इटली देशाचे जुने वैभव, फ्रान्स देशांतील बडी राज्यक्रांति, जर्मनी आणि रशिया यांचे जय, पेशव्यांचा प्रचंड राज्यविस्तार, अमेरिकन लोकांचे स्वातंत्र्य व ज्यावरून सूर्य कधीं मावळत नाहीं असे इंग्रजांचे अफाट राज्य यांचा धर्माशीं म्हणण्यासारखा कांहीएक संबंध नाहीं. यासाठी