पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
भौतिक अधिष्ठान

कधींच यशस्वी व्हावयाची नाहीं, असें त्यांचे निश्चित मत आहे आणि त्यामुळेच आपले शासन धर्मनिरपेक्ष ठेवावयाचे अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. आणि ती सर्वथैव योग्यच आहे याविषयीं लोकसत्तेच्या अभ्यासकांत मतभेद होणार नाहीं.
 पण देशाचे शासन धर्मनिरपेक्ष करावयाचे तर त्याला केवढी पूर्व तयारी करणें अवश्य असते, याची फारच थोड्यांना कल्पना असेल. आज या भूमींत हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इ. जे समाज आहेत, त्यांच्या मनावर हजारों वर्षे धर्माची सत्ता अप्रतिहतपणे चाललेली आहे. या समाजांची सर्व बैठकच धर्माच्या पायावर स्थिरावलेली आहे. त्यांच्या जीवनाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक सर्व अंगोपांगांवर धर्माची सर्वव्यापी सत्ताच निरंकुशपणे अधिराज्य गाजवीत आहे. त्यांचा व्यवहार पारलौकिक असो, ऐहिक असो, त्यांतील धोरण धर्माचा कौल घेऊनच निश्चित केलें जातें. त्यांच्या जीवनांत असा एकहि आचार नाहीं, विचार नाहीं, तत्त्व नाहीं, रूढी नाहीं कीं, जिचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पारलौकिक धर्माशीं संबंध जोडलेला नाही. अशा या भिन्न समाजांनी एकत्र येऊन घडविलेला जो भारतीय समाज त्याचे राजशासन- म्हणजे त्याच्या राष्ट्रीय प्रपंपाचें प्रधान अंग हें धर्मनिरपेक्ष करावयाचे म्हणजे या भारतीयांच्या जीवनावर धर्माची जी सर्वव्यापी सत्ता चालते ती नष्ट करून टाकणे किंवा बव्हंशी शिथिल करून टाकणे ही पहिली आवश्यक गोष्ट होय. समाजाच्या जीवनापासून केवळ शासनसंस्था कधींच विलग करता येत नाहीं. निदान अर्वाचीन काळांत तर ते अशक्यच आहे. शासनसंस्था हें समाजवृक्षाचें अंतिम फळ आहे. तेव्हां एखाद्या झाडाच्या फळांत सुधारणा करावयाची असेल, त्याची गोडी, त्याचा रस, त्याचा आकार व तेज वाढवावयाचे असेल तर ज्याप्रमाणे नुसती शेंड्याच्या आसपास छाटाछाट करून तेथे निराळी पुष्टि देण्याचा कांहीं उपयोग नसतो, तर त्या वृक्षाच्या मुळापासून नवीन जीवनरसांचे पोषण देणे अवश्य असते, त्याचप्रमाणे समाजवृक्षाचे अंतिम फळ म्हणजे जी शासनसंस्था तिच्यांत आमूलाग्र परिवर्तन करावयाचे असेल, तिचे स्वरूप समूळ बदलून टाकावयाचे असेल तर त्या वृक्षाचे मुळापासूनचे पोषणच बदलले पाहिजे, त्या समाजाचे अधिष्ठानच बदलून टाकिले पाहिजे. पूर्वीचे