पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
भारतीय लोकसत्ता

विद्येच्या प्रगतीला कधीं खंड पडला नाहीं, म्हणूनच तेथली लोकसत्ता यशस्वी होऊं शकली. भारतांत याच कार्यकारण संबंधाची पुनरावृत्ति होत आहे. अजून ही विद्या अल्पशा सुशिक्षितांच्याच कक्षेत आहे. तिचा प्रसार बहुजनांत जसजसा होत जाईल त्या त्या प्रमाणांत त्यांचे कर्तृत्व वाढून समाजांतील विषमता नष्ट होईल आणि त्यामुळे लोकसत्तेची बैठक जास्त विस्तृत आणि म्हणूनच जास्त दृढ व दुर्भेद्य अशी होत जाईल.
 जगांतल्या कोणच्याहि प्रांताचा, कोणत्याहि कालखंडाचा इतिहास पाहिला तरी, समता तेथें उन्नति व विषमता तेथे अधोगति हा महासिद्धान्त आपल्याला दिसून येतो. राजशासन कोणच्याहि प्रकारचें असले तरी हा सिद्धान्त ढळलेला दिसत नाहीं. मग लोकायत्त शासनाला समतेची किती आवश्यकता असेल, याची सहज कल्पना येईल. येथल्या पूर्वसूरींना ही कल्पना आली होती, आणि म्हणूनच आपल्या समाजांतील जन्मनिष्ठ विषमता नष्ट करण्याचे त्यांनीं यावत्शक्य प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा इतिहास आपण येथवर पाहिला. पुढील प्रकरणांत वरील प्रकारच्या विशेष अंगांच्या सुधारणेच्या नादी न लागतां समाजाचे मूळ अधिष्ठानच बदलून टाकण्याचे आगरकरांनीं जे महनीय प्रयत्न केले, त्यांचे स्वरूप विशद करून त्यानंतर लोकशाहीच्या राजकीय अंगाच्या अभ्यासाकडे आपण वळू.




प्रकरण चौथें


भौतिक अधिष्ठान
आगरकर व विवेकानंद यांचे कार्य



धर्मनिरपेक्ष शासन

 आज भरतभूमीच्या राजशासनाचीं सूत्रे ज्यांच्या हातीं आहेत, त्या पुरुषांनीं एकमुखान असे जाहीर केलें आहे कीं, या भूमीचें शासन है धर्मनिरपेक्ष असच राहील. शासनसंस्था धर्माधिष्ठित असेल तर लोकसत्ता