पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१
समतेचा महामंत्र

हें होय. यास्तव आपल्या देशांत नो जो इंग्रजी विद्येचा प्रसार होत जाईल तों तों सुधारणा, स्वातंत्र्य, सुख, यांचा अवश्य प्रसार होत जाणार ! एक इंग्रजी विद्येचें वज्र आमच्या हातीं असले, म्हणजे मग लिटनशाही, टेंपलशाही, चाटफिल्डशाही, मूरशाही वगैरे शंभर शाह्यांनासुद्धां आम्ही दाद देणार नाहीं !'
 वर तीनचार कार्यकर्त्यांचाच उल्लेख केला आहे. पण तेवढ्यांनाच भौतिक ज्ञानाची महती समजली व पटली होती असें नाहीं. ब्रिटिश अंमल येथें सुरू होऊन जो जो कोणी इंग्रजी विद्या पढूं लागला त्याला त्याला त्या विद्येचें अतुळ सामर्थ्य प्रतीत झाले होते. आणि पाश्चात्यांचे सर्व बळ या विद्येत असून आपल्या अधःपाताचे कारण म्हणजे तिचा अभाव हेंच होय असा त्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झाला होता. गेल्या शतकांत धार्मिक, सामाजिक व राजकीय अशा सर्व प्रकारच्या सुधारणा चालू झाल्या होत्या व प्रत्येक क्षेत्रांत भिन्न भिन्न मतांचे लोक आपल्या दृष्टीने कार्य करीत होते. पण त्यांतील प्रत्येकानें शाळा, कॉलेज आणि वर्तमानपत्र या त्रयीचाच आश्रय केला होता. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी 'बंगाली' हे पत्र व 'रिपन' हें कॉलेज यांच्या साह्याने राजकीय चळवळ केली. टिळक-आगरकर यांनी 'केसरी, व मराठा' ह्रीं पत्रे व 'फर्ग्युसन' हे कॉलेज याच साधनांचा आश्रय केला. स्वामी दयानंदांचे अनुयायी लाला हंसराज, लाला लजपतराय व गुरुदत्त विद्यार्थी यांना प्राधान्याने धार्मिक चळवळ करायची होती. पण त्यांचीं साधनें 'रीजनरेटर ऑफ आर्यावर्त' हें पत्र व 'दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज' हें विद्यालय हींच होतीं. सर सय्यद अहंमद यांचें पत्र 'सोशल रिफार्मर' व 'अलीगड कॉलेज' यांचा उल्लेख वर आलाच आहे. या सर्वांवरून हे स्पष्ट दिसतें कीं चळवळ कोणच्याहि प्रांतांतली असो, कोणच्याहि धर्मपंथाची असो, कोणच्याहि क्षेत्रांतली असो, तिची प्रगति पाश्चात्य विद्येवरच अवलंबून होती; आणि हे जाणूनच येथल्या नेत्यांनी त्या भौतिक विद्येचा आश्रय केला होता.
 भौतिक विद्या नसली कीं मनुष्य निसर्गाचा व त्यामुळेच अनेक शक्तींचा गुलाम होतो. आणि मग लोकसत्तेस अवश्य ती मनोवृत्ति निर्माण होणें अशक्य होते. इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञांची अखंड परंपरा निर्माण झाली, भौतिक