पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
भारतीय लोकसत्ता

दुर्बलपणामुळें व विद्यारहितपणामुळे झाले आहे. आपल्या देशांतील लोक विद्यांचा अभ्यास करीत नाहींत. निरनिराळ्या देशांचे वृत्तांत वाचीत नाहींत. जुन्या शास्त्रांवर फाजील विश्वास ठेवतात. त्यामुळे अज्ञान वाढले आहे. आतां हाच उपाय राहिला आहे की, आम्ही विद्या व कला यांचें ज्ञान संपादन करावें, नीतिमान् व्हावें आणि सरकारजवळ स्वतःचे खरे हक्क मागावे.' वरील संस्थेच्या सभेत पहिल्या वर्षी रसायनशास्त्र, मराठ्यांचा उत्कर्षापकर्ष, हिंदुस्थानांतील विद्या व कला अशा तऱ्हेच्या विषयांवर निबंध वाचले गेले. त्यावरून तिच्या कार्याचे स्वरूप समजून येईल. (दादोबा पांडुरंग- प्रियोळकर पृ. ३८०, ४०४)
 सर सय्यद अहंमद यांनी १८६२ साली गाझीपूर येथे 'सायंटिफिक सोसायटी' नांवाची संस्था स्थापन केली. ती आपल्या लोकांत पाश्चात्य विद्येचा प्रसार करावा या हेतूनेच केली. या संस्थेच्या द्वारा इंग्रजीतील अनेक उत्तम ग्रंथांचे उर्दूत भाषांतर झाले. पुढे अलीगड विद्यापीठ स्थापन झाले. त्यांतहि भौतिक विद्येच्या प्रसारास फारच महत्त्व होते आणि वरील संस्थेची प्रगतीहि त्या विद्यापीठाच्या अनुषंगाने होत होती. गेल्या शतकाच्या शेवटच्या चरणांत मुसलमान समाजांत पाश्चात्य विद्येचा जो कांहीं प्रसार झाला त्याचें पुष्कळसे श्रेय वरील संस्थांनाच आहे.
 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे, आतांपर्यंत वर ज्या सामाजिक सुधारणा सांगितल्या त्यांना त्या अकाली घडत आहेत म्हणून फारसे अनुकूल मत नव्हते; पण भौतिक ज्ञानाच्या बाबतींत मात्र त्यांची दृष्टि सर्वथैव पुरोगामी होती. 'इंग्लिश लोकांच्या उत्कर्षाचा हेवा करण्यापेक्षां त्यास कारणीभूत जे त्यांचे गुण त्यांचा हेवा करणे हितावह होईल. तेव्हां आपल्या सुदैवानें ज्ञानप्रसाराचीं जीं अमोलिक साधने आपल्या हाती आहेत, त्यांचा उपयोग करून घेण्यास आमच्या देशबंधूंनी कसूर करूं नये. असे केलें असतां त्यांनी आपला धर्म जगविला व आपल्या देशास मोठे भूषण आणले असे होईल.' अशा तऱ्हेचीं मतें सांगून शास्त्रीबुवांनी ज्ञानाची महती गायिली आहे. 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत विष्णुशास्त्री म्हणतात, 'अमेरिकेतल्या लोकांनी गेल्या शतकांत काय प्रकार केला तो तर जगजाहीरच आहे. असो. तर एकंदरींत सांगावयाचे काय कीं सज्ञान दशेचें फळ देशोन्नति