पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९
समतेचा महामंत्र

होय, ज्ञान हेच सामर्थ्य होय, ज्ञान हाच राष्ट्रीय मोक्ष होय, हा सिद्धांत त्यांच्या मनःपटलावर अगदी कोरून गेला होता आणि म्हणूनच त्यांनी अशा या चिंतामणीच्या अधिगमासाठी विश्वप्रयत्न केलेले दिसतात.
 १८३३ सालीं विलायत सरकारने हिंदी लोकांमध्ये विद्याप्रसार व्हावा यासाठी मंजूर केलेल्या रकमेचा विनियोग कसा करावा, ती रक्कम कोणत्या विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावी याविषयीं हिंदुस्थान सरकार विचार करीत होतें. त्यावेळीं ही सर्व रक्कम पाश्चात्य विद्येच्या प्रसारासाठींच खर्च केली जावी असा राममोहन यांनी सरकारकडे अर्ज केला. त्या अर्जात, "गणित, रसायन, शरीरशास्त्र, भौतिकविद्या इ. ज्या शास्त्रांना पूर्णत्वास नेल्यामुळे युरोपीयन राष्ट्र जगाच्या पुढे गेलीं, तीं शास्त्रें आम्हांस शिकवावी. जुनें व्याकरण, किंवा तत्त्वज्ञान यांचा आज ते शिकणाराला किंवा समाजाला कांहीं उपयोग नाहीं. वेदांताच्या सिद्धांतापासून तरुणांना समाजाचे उत्कृष्ट घटक कसे बनवावे याचे शिक्षण मिळणार नाहीं. लॉर्ड बेकनच्या पूर्वीच्या काळी जें ज्ञान युरोपांत होते ते इकडे विपुल प्रमाणांत आहे. येथे उणीव आहे ती भौतिक विद्येची आहे." अशा तऱ्हेचे विचार त्यांनी सांगितले आहेत. यावरून अनुभवशून्य ग्रंथप्रामाण्याचे युग संपून येथे अनुभवगम्य व बुद्धिगम्य ज्ञानाचे युग सुरू व्हावे याविषयीं राममोहन यांना कशी तळमळ लागून राहिली होती ते दिसून येते.

विद्येची महती

 दादोबा पांडुरंग यांनी महाराष्ट्रांत याच तऱ्हेचे विचार प्रसृत करून भौतिकज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 'स्टूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक् सोसायटी' ही संस्थाहि १८४८ साली काढली होती. हिच्या मराठी शाखेचे अध्यक्ष दादोबा असून गुजराथी शाखेचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते. दादोबांचे मित्र गोवर्धनदास हे एका प्रसंगी म्हणाले, 'इंग्रजांच्या राज्यापासून प्रजा निर्धन होऊन गेली आहे. व्यापार सर्व बुडाला. इंग्रजी राज्य आणखी पांचपन्नास वर्षे राहील तर प्रजा दरिद्री होऊन जाईल.' यावर दादोबांनी उत्तर दिले, 'तुम्ही म्हणतां ही गोष्ट खरी आहे; पण यांत सारा दोष आपल्याच लोकांचा आहे, हे लक्षांत ठेवले पाहिजे. हे सर्व लोकांच्या