पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
भारतीय लोकसत्ता

धनांची प्राप्ति होणे हे पुष्कळसे नशिबावर अवलंबून असल्यामुळें तीं विषमतेला कारणीभूत होतात. पण ज्ञानधनाचे तसे नाहीं. ते मानवाच्या स्वाधीन आहे आणि त्यामुळेच सर्व प्रकारच्या विषमतेवर ज्ञानधन हा मोठा प्रभावी उतारा आहे. सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत समता निर्माण झाल्यावांचून लोकसत्तेला अर्थ नाहीं हें मागें अनेक वेळा सांगितले आहे. ही सर्व प्रकारची समता प्रस्थापित करण्याचे एक प्रभावी साधन म्हणजे भौतिक ज्ञान हें होय. स्वतःला शूद्र गणणारे ज्योतिबा फुले उंच स्थानी जाऊन बसले ते यामुळेच. याच्याच जोरावर दादोबा पांडुरंग हे वैश्य असून पाणिनीच्या पदवीला गेले आणि याच्याच साह्याने डॉ. आंबेडकर हे भरतभूमीचे मनु झाले आहेत. या ज्ञानामुळेच पुढेमार्गे सांस्कृतिक समता निर्माण होऊन जातिभेद नष्ट होण्याचा संभव आहे.
 शास्त्रीय ज्ञानाचा लोकसत्तेशीं किती निकटचा संबंध आहे, ते ब्रिटिश लोकसत्तेचा इतिहास वाचणाऱ्यांना सांगावयास नको. सर्व प्रकारच्या दास्यांत अज्ञानजन्य दास्य हे मानवी प्रतिष्ठेला अत्यंत घातक आहे. कारण त्यामुळे मानवाचें मनच प्रज्ञाहत होते. आणि मग प्रज्ञासंपन्न व प्रज्ञाहत असे समाजाचे दोन गट होऊन तेथे विषमता निर्माण होते. लोकशाहींत प्रत्येक मनुष्य समभूमीवर असून तत्वतः तरी तो भावी राज्यकर्ता आहे असे गृहीत धरलेले असते. आणि राज्यकर्त्या पुरुषाच्या मनाला जी रग असणे अवश्य आहे ती ज्ञानांवाचून दुसऱ्या कशानेंहि उत्पन्न होणे शक्य नाहीं. भोळे- भाबडे, वेडेवांकुडे, अज्ञ, साधे, बालमनाचे, निष्पाप, निष्कपटवृत्तीचे लोक अध्यात्मक्षेत्रांत कितीहि उंच पातळीवर असले तरी राष्ट्रीय व्यवहारांत आणि विशेषतः लोकायत्त शासनांत अशा लोकांना कसलेहि स्थान प्राप्त होणें शक्य नाहीं.
  ज्ञानाविषयींचा हा महासिद्धांत गेल्या शतकांतील धुरंधरांनी पूर्णपणें जाणला होता. आणि म्हणूनच त्यांनी या भौतिक ज्ञानाचा जणूं ध्यास घेतला होता. गेल्या शतकांतील कोणच्याहि क्षेत्रांतील कोणचाहि कार्यकर्ता घेतला तरी त्याचा ज्ञानप्रसाराशी कोठे ना कोठें संबंध आलेलाच आहे असे दिसते. या ज्ञानावांचून आपल्या समाजाची उन्नति होणें अशक्य आहे, याविषयी त्या विचारवेत्यांना तिलप्राय संदेह नव्हता. ज्ञान हीच संजीवनी