पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७
समतेचा महामंत्र

नाहीं' 'इतर कोणच्याहि समाजांत मुसलमान समाजाइतकें स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नाहीं.' अशीं विधाने मुस्लीम समाजधुरीणांनीं याच काळांत केली. (मॉडर्न इस्लाम इन् इंडिया- स्मिथ पृ. ७८)
 या सगळ्याचा तात्पर्यार्थ असा कीं स्त्रीचें व्यक्तित्व व तिचे स्वतंत्र अस्तित्व या काळांत सर्वांना मान्य होऊं लागले होते. डॉ. कुमारस्वामींनीं जुन्या धर्मग्रंथांचा अभिमान धरला तरी तो नवे विचार सांगण्यासाठींच घरला. 'प्रत्येक क्षेत्रांत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधि मिळाली पाहिजे. स्त्रियांना समाजाने आर्थिक स्वास्थ्य प्राप्त करून दिले पाहिजे. स्त्रियांनीं पुरुषांचे अनुकरण करण्याच्या भरीस न पडतां स्त्रीत्वाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठीं- खऱ्याखुऱ्या स्त्रिया होण्यासाठी लढा केला पाहिजे.' अशाच विचारांचा त्यांनीं पुरस्कार केला आहे. तेव्हां स्त्रियांचे स्वतंत्र स्थान, त्यांचे व्यक्तित्व, त्यांच्या जीविताची प्रतिष्ठा राम मोहन रॉयापासून डॉ. कुमारस्वामीपर्यंत सर्वांनाच या काळांत मान्य झाली होती असे दिसतें. कोणी तीं पाश्चात्यांच्या आधारे सांगितली, कोणी पौर्वात्यांच्या. ती मान्य झाली हाच भाग महत्त्वाचा आहे. लोकसत्ताक शासनाच्या प्रगतीस महत्त्व त्याचे आहे.
 गेल्या शतकांत लोकशाहीची सिद्धता कशी होत होती, तें आपण पहात आहों. माववत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति हा लोकसत्तेच्या तत्त्वांचा मूलाधार आहे, हें आरंभींच सांगितलें आहे. त्या प्रतिष्ठेच्या विवेचनांतूनच आपण समतेच्या विचाराकडे आलो. कारण अंध कर्मकांडाप्रमाणेच जन्मनिष्ठ विषमता ही मानवाच्या प्रतिष्ठेला घातक आहे.

विषमतेला सुरुंग - भौतिकज्ञान

 हीं विषमता नष्ट करावी म्हणून कोणी कसे प्रयत्न केले ते येथवर आपण पाहिले. आतां विषमता नष्ट करणाऱ्या आणखी एका शक्तीचा विचार करावयाचा आहे. भौतिक ज्ञान ही ती शक्ति होय. मानवामानवांत उच्चनीचता निर्माण होते ती त्यांच्या जवळच्या विषम धनामुळे होते. विषमतेला कारण होणारीं हीं धनें अनेक प्रकारचीं आहेत. उच्च कुलांत जन्म, पारमार्थिक अधिकार व भौतिक संपत्ति, या धनांची महती लोकशाही पूर्वयुगांत फार होती आणि अजूनहि ती समूळ नष्ट झालेली नाहीं. या