पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
भारतीय लोकसत्ता

फार संताप येत असे. लोकभ्रम या निबंधांत त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले आहे कीं, आपल्या पतीच्या मार्गे वर्षोनुवर्ष एखाद्या तपस्व्याप्रमाणे राहणाऱ्या या योगिनीचे दर्शन अपवित्र तर नाहीच, पण ते अत्यंत शुभ मानले पाहिजे. अशी खडतर तपश्चर्या करून कालक्रमणा करणारी ही स्त्री खरोखर आपल्या कुलास व मानवजातीस भूषणच आहे. (निबंधमाला पृ. २०४) आगरकरांचे विचार या बाबतींत किती क्रांतिकारक होते हें सर्वांस विदितच आहे. स्त्री ही पुरुषास मोह घालणारी, त्याला मोक्षमार्गापासून च्युत करणारी, त्याच्या उत्कर्षाच्या आड येणारी अशी कोणी दुष्ट शक्ति आहे म्हणून तिचा सहवासच नव्हे दर्शनहि शक्य तो टाळावे अशी त्याकाळीं सनातनी रूढी असतांना, स्त्रीपुरुषांचा सहवास हरएक प्रसंग घडून यावा, पाश्चात्य समाजास जी एक उल्हासवृत्ति प्राप्त झाली आहे ती स्त्रीपुरुषांच्या मिश्रणामुळेच होय, असा उपदेश त्यांनी केला आहे आणि जुनी कुटुंबव्यवस्था स्त्रीच्या व्यक्तित्वाच्या आड येते हे जाणून 'सासुरवासाचें घोडें मुळींच नाहींसे झाले पाहिजे. लग्न झाल्यावर मुलीने आईबापांचे घर सोडावें तें एकदम नवऱ्याच्या स्वतंत्र संसाराचे आधिपत्य पत्करावे' असें आजहि फारसें अमलांत न येणारे मत त्यांनी मांडलें आहे. (निबंधसंग्रह पृ. २२९)
 याच सुमारास स्त्रीच्या व्यक्तित्वविकासास पोषक अशी एक निराळीच विचारप्रणाली आपल्याकडे सुरू झाली. आतांपर्यंतचे सुधारक बहुधा, पाश्चात्य समाजांत स्त्रियांचा दर्जा श्रेष्ठ आहे, असे सांगून त्या रीतीचे आपण अनुकरण केले पाहिजे असे प्रतिपादन करीत. पण १८९० च्या सुमारास ही लाट फिरली. या वेळीं अनेक पंडितांनी असे प्रतिपादन सुरु केलें कीं आमच्या पूर्वीच्या धर्मशास्त्रांत स्त्रियांचा जो दर्जा सांगितला आहे, त्यांना जी प्रतिष्ठा आहे तशी जगांत कोठेच नाहीं. त्यामानाने पाश्चात्य स्त्रियांची स्थिति फारच अनुकंपनीय आहे. तेव्हां आम्हांला पाश्चात्यांपासून कांहींच शिकावयाचें नाहीं. डॉ. ए. के. कुमारस्वामी यांनी हा विचार मोठया अट्टाहासाने मांडला आहे (इंडियन नेशन बिल्डरस, भाग ३ रा. पृ. ३२०- ३२३). यावेळीं हिंदुस्थानांतल्या सर्वच जमातींत ही विचारप्रणाली प्रादुर्भूत झाली होती. मुसलमान समाजांतील नेतेहि याच तऱ्हेचे प्रतिपादन करूं लागले. 'इस्लाम धर्माने स्त्रियांना जो मान दिला आहे, तो इतर कोणत्याहि धर्मांनें दिला