पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५
समतेचा महामंत्र

विपरीत असेल तर एकीकडे ठेवल्यास चिंता काय ?' असा त्यांनी निर्भयपणें प्रश्न केला आहे (३९८). स्त्रीचा विवाह प्रौढपणीं व्हावा एवढेच ते सांगत नाहींत, तर तिचें 'स्वयंवर व्हावें हेंच प्रशस्त. लग्न हें ज्याचे त्याचे काम आहे. त्यांत इतरांनीं पडणें योग्य नव्हे' असा विचार सांगतात. (३८८) यांत स्त्रीच्या व्यक्तित्वास त्यांनी मान्यता दिल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यांच्या मतें, सुखाविषयींचाहि अधिकार पुरुषाप्रमाणेच स्त्रियांना आहे. अमेरिकन व ब्रिटिश लोकशाहीचे विवेचन करतांना 'प्रत्येक व्यक्तीस सुखाचा समान अधिकार आहे' हेंच तत्त्व लोकसत्तेच्या बुडाशीं कसें आहे आणि एकोणीसाव्या शतकांत जुन्या मतांत क्रांति होऊन हें नवें मत मान्य होतांच लोकशाहीची वाढ कशी झपाट्याने झाली तें अनेक पंडितांनी सांगितलें आहे. त्यावरून लोकहितवादींच्या या विचारार्चे मह्त्त्व ध्यानांत येईल. स्त्रिया, हीनजाती, अस्पृष्ट यांचा समाजांत निर्माण होणाऱ्या सुखावर अधिकारच नाहीं अशी विचारसरणी लोकसत्तापूर्व युगांत सर्वत्र रूढ होती. तिला या लेखकानें धक्का दिला आहे. जो अधिकार संसारासंबंधीं व सुखाविषयीं पुरुषांस आहे तोच स्त्रियांस असावा असें त्यांचे पूर्ण पुरोगामी मत होते (३९८). एके ठिकाणी ते म्हणतात की, 'स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हां आपला अधिकार स्थापतील आणि संसारसुखास हानि करणाऱ्या पंडितांपासून तहनामाच करून घेतील. जेव्हां स्त्रिया विदुषी होतील तेव्हां या पंडितांस चरण- संपुष्टांनी पूजा अर्पण करतील यांत संशय नाहीं; परंतु याच कारणास्तव ब्राह्मण लोक स्त्रियांस शहाण्या करण्यास प्रतिकूल आहेत' (४०३).
 विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी स्त्रियांनीं विवाह केलाच पाहिजे असे नाहीं, असा विचार आपल्या वेदोक्तधर्मात सांगितला आहे. विष्णुबुवांनीं विवाहविच्छेदालाहि मान्यता दिली होती; पण याहिपेक्षां विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मांडलेले मत कालौघ फिरल्याचे खरे द्योतक म्हणतां येईल. विधवा स्त्रियांना आपल्या समाजांत अगदीं अमंगळ व हीन लेखतात. शुभप्रसंगी त्यांचे दर्शन अगदीं त्याज्य असें अजूनहि मानले जाते. याचा शास्त्रीबुवांना
 भा. लो.... ५