पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
भारतीय लोकसत्ता

विवाहाचा निषेध केला असून विधवाविवाहांस अनुमति दिली आहे. स्त्रीशिक्षणाचा तर त्यांत फारच जोराने पुरस्कार केला आहे.
 स्त्रीस्वातंत्र्याच्या ज्या चळवळी गेल्या शतकांत झाल्या, त्यांचा समग्र इतिहास येथे पहावयाचा नाहीं. साधारण बहुश्रुत वाचकास तो ठोकळ मानानें ज्ञात असतो. लोकशाहीच्या दृष्टीने या चळवळीमुळे येथल्या समाजाची मनोवृत्ति कशी बदलत गेली, स्त्रीकडे पहाण्याची दृष्टीच कशी आमूलाग्र फिरून गेली ते आपणांस पहावयाचे आहे. सतीचा विचार करतांना याचें थोडेसे दिग्दर्शन वर केलेंच आहे. इतर पंडितांच्या उद्गारांवरून त्याचाच पाठपुरावा कसा होतो ते आतां पाहूं.

स्त्रीदास्यविमोचन

 स्त्रीजविनाविषयीं जेवढे म्हणून नवीन आणि क्रान्तिकारक विचार आहेत तेवढे बहुतेक लोकहितवादी यांनी सांगून टाकले आहेत. संसारांत व समाजांत स्त्रियांचे अधिकार पुरुषांच्या पूर्ण बरोबरीचे आहेत हा विचार त्यांनी अनेक वेळां सांगितला आहे. 'जसे पुरुष तशा स्त्रिया आहेत हें आंधळया हिंदु लोकांस समजो' (शतपत्रे पृ. ३७९) 'ज्या देशांत स्त्रियांचे अधिकार लोक मानीत नाहींत त्या देशांत लोकांची स्थिति वाईट असते.' (३७९) 'याकरितां माझे ऐका आणि स्त्रियांस पुरुषांसारखे अधिकार आहेत असे ठरवा आणि हा धर्म चालू करा.' (३८६) अशा तऱ्हेचे समान अधिकाराचे प्रतिपादन लोकहितवादींनी केले आहे. स्त्रीशिक्षणाचे व विधवा पुनर्विवाहाचे अनेक पुरस्कर्ते गेल्या शतकांत झाले. पण त्यांतील अनेकांनी जुन्या शास्त्रांतील वचनें काढून त्यांच्या आधारें स्त्रियांची स्थिति सुधारण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या व एकंदर समाजाच्या दृष्टीने हे कार्य मोठे आहे यांत शंका नाहीं. पण त्यांत लोकशाहीचीं व व्यक्तित्वाचीं बीजें नाहींत. तीं वरच्यासारख्या प्रतिपादनांत आहेत. म्हणूनच आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे. लोकहितवादींनीं अनेक ठिकाणी असा स्पष्ट उपदेश केला आहे की सुधारणेच्या आड धर्मशास्त्र येत असेल तर त्यास बाजूस सारून आपण सुधारणा केली पाहिजे. 'शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरितां रीति घातली आहे त्यांहून जर कांहीं