पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३
समतेचा महामंत्र

 स्त्रीदास्यविमोचनाच्या क्षेत्रांत पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीं जे प्रयत्न केले, त्यांना फार महत्त्व आहे. आपल्या हयातीत त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकंदर चाळीस शाळा काढल्या आणि सर्व बंगालभर स्त्रीशिक्षणाच्या चळवळीचा पुरस्कार केला; त्याचप्रमाणे विधवाविवाहाची चळवळ करून सन १८५६ सालीं विधवाविवाहाचा कायदा सरकारकडून करून घेतला. बहुपत्नीकत्वाच्या दुष्ट चालीविरुद्धहि त्यांनी फार परिश्रम केले, पण त्यांत त्यांना फारसे यश आले नाहीं. त्यांच्या मागून ब्राह्मसमाजाचे पुढारी केशव चन्द्रसेन यांनीहि समाजांत स्त्रीस्वातंत्र्याचे सर्वांगीण प्रयत्न करून बराच पल्ला गांठला.
 बंगाल मागोमाग महाराष्ट्रांत आणि त्यानंतर पंजाब व मद्रास प्रांतांत स्त्रीस्वातंत्र्याच्या सर्व प्रकारच्या चळवळी सुरू झाल्या. महाराष्ट्रांत पुण्याला महात्मा फुले यांनी १८५१ सालीं मुलींची शाळा घातली व आपल्या पत्नीला शिक्षण देऊन तिला तेथे शिक्षिकेचे काम सांगितलें. विष्णुशास्त्री पंडित यांनी जुन्या शास्त्रांचें मंथन करून त्यांतून विधवाविवाहास शास्त्राधार काढून त्यासाठी महाराष्ट्रांत मोठी चळवळ केली; अनेक वाद केले, लेख लिहिले, व्याख्याने दिली व स्वतः पुनर्विवाहहि केला. लोकहितवादी, भांडारकर, रानडे, आगरकर यांनी आणि वाच्छा, मलबारी या पारशी गृहस्थांनीं स्त्रियांचे शिक्षण, प्रौढविवाह आणि त्यांचे आर्थिकस्वातंत्र्य यांसाठी अखंड परिश्रम करून लोकमताला नवीन वळण लावले. पंजाबांत दिल्ली येथे सर सय्यद अहंमद आणि त्यांचेच अनुयायी चिराग अल्ली, मुस्ताफा खान व खुदाबक्ष यांनी इस्लाम धर्मात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य अशाच जोमाने सुरूं केलें होते. स्त्रियांचा पडदा, बहुपत्नीकत्व, त्यांचें दास्य, अज्ञान यावर त्यांनी जोरानें टीकास्त्र चालवून इतके क्रांतिकारक विचार सांगण्यास प्रारंभ केला कीं, मुसलमान समाज खवळून जाऊन त्यानें सर सय्यद यांना खुनाच्या धमक्या देण्यापर्यंत मजल आणली. पण ते किंवा त्यांचे अनुयायी स्वीकृत कार्यापासून ढळले नाहींत. पंजाबातील हिंदु समाजांत स्वामी दयानंद व त्यांचे शिष्य लाला हंसराज, गुरुदत्त विद्यार्थी व लाला लजपतराय यांनीं स्त्रीजीवनांत अशीच क्रान्ति घडवून आणण्यासाठीं अनेक उद्योग आरंभिले. सत्यार्थप्रकाश या दयानंदाच्या ग्रंथांत बाल-