पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
भारतीय लोकसत्ता

आहे. त्यांच्या पुरस्कर्त्यांच्या मतें स्त्रीच्या जीविताला स्वतंत्र अर्थच नाहीं. स्त्री ही पुरुषाची एक पडछाया आहे. संसार- मग तो राष्ट्रीय असो वा व्यक्तिगत असो- तो मूळ पुरुषांचा आहे आणि स्त्री है एक त्याचे साधन आहे हीच कल्पना या बंधनांच्या बुडाशीं गृहीत धरलेली आहे. संरक्षणासाठी स्त्रीवर बंधने घालणे हे केव्हांहि योग्य ठरेल, पण जेथें तो प्रश्न नाहीं तेथेहि ह्रीं बंधने जारी असतात आणि त्यामुळे कर्मकांडाप्रमाणेंच, हीं बंधने स्त्रीचा जड पार्थिव देह ध्यानीं घेऊनच सांगितलेलीं असतात यांत शंका रहात नाहीं. स्त्रीचें मन शुद्ध कीं अशुद्ध हा त्या वेळी प्रश्नच नव्हता. तिच्या देहावर दुसऱ्यांची दृष्टि पडली की ती भ्रष्ट होते असा विचार मनांत असल्यावांचून तिला पडद्यांत ठेवावे असे कोणाच्याच मनांत येणार नाहीं. मानवी प्रतिष्ठेचा उपमर्द तो हाच होय आणि हे जाणूनच गेल्या शतकांतील समाजधुरीणांनी जातीय- विषमतेविरुद्ध जशी मोहीम सुरू केली त्याचप्रमाणे स्त्रीपुरुषविषमतेविरुद्ध हि तितक्याच निकराने मोहीम सुरू केली.
 हिमालयाच्या उदरांतून निघालेल्या जलवाहिन्यांनी ज्याप्रमाणे भारतवर्षांचे पोषण होते, त्याचप्रमाणे राजा राममोहन राय यांच्या हिमनगाप्रमाणेच विशाल असलेल्या मनांतून उगम पावणाऱ्या वैचारिक जलवाहिन्यांनीं आधुनिक भारतवर्षाचे पोषण होत आहे याविषयीं कोणी वाद करील असे वाटत नाहीं. कर्मकांड, मूर्तिपूजा, जातिभेद, सती, जुनी शाद्विक विद्या, तज्जन्य शब्दप्रामाण्य अशा ज्या अनेक घातक रूढी हिंदुसमाजाने शिरोधार्य मानल्या होत्या, त्यांतील एकहि त्या महापुरुषाच्या क्रान्तिप्रवण दृष्टींतून सुटली नव्हती. स्त्रीस्वातंत्र्याचा प्रश्न तर त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचा वाटत असे. सतीची चाल नष्ट करण्यासाठीं त्यांनी लॉर्ड बेंटिक यांनकडे जो अर्ज केला होता त्यांत, शास्त्राच्या दृष्टीने किंवा सारासार विचारानें, कसेहि पाहिले तरी सती हे सर्व खूनच आहेत, असे मत दिलें होतें. भटाभिक्षुकांच्या सक्तीमुळे चितेवर दीनपणें बळी जाणाऱ्या अबलांकडे पाहून त्यांच्या जिवाचा केवढा तळतळाट झाला असेल त्याची यावरून कल्पना येईल. राममोहन यांनी स्त्रीला दास्यांत ठेवणाऱ्या सर्व रूढींच्या विरुद्ध चळवळ सुरू केली होती पण त्यांत त्यांना फारसें यश आलें नाहीं. सतीची चाल कायद्याने बंद झाल्याचे पाहाण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले होते.