पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१
समतेचा महामंत्र


स्त्री-पुरुष समता

 आचारधर्म व विषमसमाजरचना यांचे हीन गणलेल्या जातीवर जसे अत्यंत अनिष्ट परिणाम होतात तसेच स्त्रीजीवनावरहि त्यांचे अनिष्ट व घातक परिणाम होतात. या जातींप्रमाणेच स्त्रियांनाहि अशा समाजांत जवळजवळ शून्य प्रतिष्ठा असते आणि त्यामुळे त्यांचें जिणें म्हणजे जिवंत नरकवासच होऊन बसलेला असतो. जुन्या धर्माने व रुढींनी स्त्रियांवर जीं अनंत बंधने लादली आहेत, त्यावरून स्त्री ही एक मानवी व्यक्ति आहे हा विचारच त्यांना मान्य नव्हता असे स्पष्टपणे दिसतें. मग तिच्या स्वतंत्र व्यक्तित्वाची जुनीं धर्मशास्त्रे व रूढी परवा करीत नसतील यांत काय नवल आहे !
 पती मृत होतांच स्त्रीनें सती गेलें पाहिजे, असें सांगणारा धर्म व ती जात नसल्यास तिला सक्तीने सती घालविणारी रूढि यांना स्त्रीच्या जीविताबद्दल किती महत्त्व वाटत असेल हे काय सांगावयास पाहिजे ? धर्माची आज्ञा शिरसावंद्य मानून भरतभूमींतल्या अनेक सुकन्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या त्यांच्या दिव्य त्यागाबद्दल त्यांना शतशः अभिवादन केले पाहिजे यांत वादच नाहीं; पण तरीसुद्धां त्या त्यांच्या आत्मत्यागाच्या पाठीशी धर्मांनें जें तत्त्व उभे केले आहे त्याचा सुज्ञ माणसानें निषेधच केला पाहिजे. स्त्रीचे आपल्या पतीवर कितीहि अलौकिक प्रेम असले तरी पतीच्या मागें तिला आपल्या संसाराची जबाबदारी असते व सामाजिक कर्तव्येहि असतात. तेव्हां स्त्री अगदीं पूर्ण राजीखुशीनें व केवळ पतिप्रेमानें जरी सती जात असली तरी आचार्य जावडेकर म्हणतात त्याप्रमाणे, तिची ही कर्तव्यबुद्धि तामसच म्हटली पाहिजे, कारण या विचारसरणींत स्त्रीला स्वतंत्र व्यक्तित्व नाहीं असे गृहीत धरलेले आहे. स्त्रीस्वातंत्र्याच्या श्रेष्ठ ध्येयाच्या दृष्टीनें 'सती' हा कोणत्याहि स्वरूपांत अधर्मच ठरतो, असें अगदी निर्भयपणे आचार्यानी जें मत मांडले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. (आधुनिक भारत पृ. ८२)
 पडद्याची चाल, बालविवाह, विधवाविवाहाची बंदी, स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध या सर्व नियमनांच्या मागें स्त्री-जीविताविषयींचा तो एकच दृष्टिकोन