पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
भारतीय लोकसत्ता

नाहीं. सर्व जाति रक्तानें एक झाल्यावांचून हा विचार कायमचा नष्ट होणार नाहीं हें खरे आणि भरतभूमींत तेच होणें अवश्य आहे. ज्या वर्णसंकराची भीति भारतीयांना पावलोपावली वाटते तो येथे घडून येणें हेंच समाजाला हितावह आहे. युद्ध झाले तर वर्णसंकर होईल ही भीति श्रीकृष्णाने गीतेत प्रगट केली आहे. पण त्यावेळचे त्याच्या भोवतालचे कर्ते पुरुष पाहिले तर ते सर्व वर्णसंकरजन्यच होते असे दिसेल. व्यास, विदुर, धृतराष्ट्र, पांडु, पांडव, कौरव- सर्वांचा इतिहास हेच दाखवितो. व्यावसायिक वर्णसंकर द्रोण, कृप, आणि स्वतः श्रीकृष्ण यांनी केलाच होता. तेव्हां वर्णसंकर अत्यंत हितावह होय यांत शंकाच नाहीं आणि तोच येथे घडला पाहिजे. पण शंभर वर्षांच्या अल्प काळांत आपण समसंधीची पायरी गांठली आहे ही प्रगति कांहीं थोडी नाहीं. तिच्यामुळे भिन्नभिन्न जातींत सांस्कृतिक समता निर्माण होऊन पुढेमागें सर्व जाति रक्ततः एक होऊन नातील अशी आशा धरून तसा नेटानें प्रयत्न करणें हें आतां आपले काम आहे.
 मानवी जीवनाची प्रतिष्ठा म्हणजे काय हे वाचकांनीं एकदां नीट समजावून घेतले आणि ती कल्पना मनाशीं दृढपणे आकळून ठेवली तर त्यांना लोकसत्तेविषयींचे अनेक सिद्धान्त अगदी सुलभ होऊन जातील. लोकशाहीचा सारा ग्रंथ या एका सूत्राने सहन लावतां येईल, इतके या तत्त्वाचें महत्त्व आहे. वर ज्या विषम समाजव्यवस्थेचे वर्णन केले आहे, ती प्रत्यक्ष व्यवहाराच्या दृष्टीनें तर घातक आहेच पण मानवी प्रतिष्ठेच्या दृष्टीने ती जास्तच घातक आहे. कारण जड कर्मकांडाप्रमाणेच या विषमतेमुळे मानवाच्या उच्च गुणांचा उपमर्द होतो. ही व्यवस्था फक्त त्याचा देहच ध्यानांत घेते. हृदयाचे, मनाचे, बुद्धीचे गुण हे तिला गौण वाटतात. 'दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम् ।' असे आत्मिक हुंकाराचे दिव्य बोल या समाजव्यवस्थेमुळें गुदमरून टाकले जातात आणि त्यामुळे समाजांतील कांहीं विशिष्ट जाति सोडून दिल्या की बाकीच्यांच्या जीवनाला प्रतिष्ठाच रहात नाहीं. प्राचीन गणराज्यांत जातिभेद होते म्हणूनच तेथें खरी लोकसत्ता होती असे म्हणणे सयुक्तिक नाहीं असें ज पहिल्या प्रकरणांत सांगितलें तें याच कारणासाठी.