पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९
समतेचा महामंत्र

आठशे वर्षात ही भावना निर्माण होणें शक्य नव्हते; कारण जातिभेदांच्या बंधनांना या कालांत फार कडक रूप प्राप्त झालें होतें, मराठेशाहीत भागवतधर्मीय संतांच्या तत्त्वोपदेशामुळे समतेची भावना कांहींशीं रूढावत चालली होती. संतांना मुख्यतः पारमार्थिक क्षेत्रांतलीच समता अभिप्रेत असली तरी तिचा कांहींसा प्रसार ऐहिक व्यवहारांतहि होत होता आणि त्यामुळे महाराष्ट्रांत तरी पुष्कळच सुपरिणाम झालेला दिसून आला होता. संतांनीं परमार्थात लोकसत्ताच प्रस्थापिली होती असे अनेक पंडितांनीं म्हटले आहे; त्याला बराच अर्थ आहे. महाराष्ट्रांत तरी तो निश्चित आहे. कारण त्या पारमार्थिक लोकशाहीची वृत्ति हळू हळू ऐहिक व्यवहारांत पसरून महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्याचे बंध एकदम ढिले झाले आणि धनगराचें राजपद, शुद्राचे धर्मगुरुत्व व ब्राह्मणाचे सेनाध्यक्षत्व जनतेने एकदम मान्य केलें. लोकशाहीमुळें समाजाच्या कर्तृत्वाला एकदम उमाळे येऊन सर्वत्र त्याला बहर येतो असें म्हणतात तें किती सार्थ आहे ते येथे दिसते. इतर संत व रामदास यांच्या कार्याचे विवेचन करतांना रामदासाने महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्याची पुन्हां प्रस्थापना केली, असें राजवाडे यांनी म्हटले आहे आणि त्या विवेचनावरून राजवाड्यांना जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्यच अभिप्रेत होते, असे दिसते. तसें असेल तर राजवाड्यांचे मत अगदीं भ्रामक व निराधार असे आहे. रामदासाने काय केले हा भाग वेगळा, महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्य पुष्कळ नाहींसेंच होत होते आणि त्यामुळेच महाराष्ट्राला भारतीय इतिहासांत अतुल असा पराक्रम करतां आला. पण हे सर्व जरी खरे असले तरी जी समता आज आपण अपेक्षिता तिच्या मानानें महाराष्ट्रांतली ती समता कांहींच नव्हती. ज्या जातींनीं स्मृति ऐकल्या, तर त्यांच्या कानांत तापलेल्या शिशाचा रस ओतावा असे मनूनें सांगितले आहे त्या जातीचाच एक थोर पुरुष- डॉ. आंबेडकर- आज या आर्यावर्तात त्याच मनूच्या पदवीला जाऊन पोचला आहे. लोकशाहीला जी समता अवश्य आहे ती ही होय. जातीय विषमतेचें मुख्य शल्य हें कीं त्या व्यवस्थेत हीन गणलेल्या जातींना उत्कर्षांची संधि मिळत नाहीं आणि मग त्यांचे कर्तृत्व कुजत पडते. ही दुरवस्था नष्ट होऊन सर्वाना उत्कर्षांची समसंधि मिळू लागली की जातीय विषमतेचा विषार बव्हंशी नष्ट झाला असें म्हणण्यास हरकत