पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
भारतीय लोकसत्ता

 जन्मनिष्ठ उच्चनीचता नष्ट करण्याचे गेल्या शतकांत या भूमीत जे प्रयत्न झाले त्यांचा इतिहास आपण पहात आहे. या इतिहासांत स्वामी दयानंदांनीं प्रस्थापिलेल्या आर्यसमाजानें पंजाबांत जे कार्य केले त्याला फार महत्वाचे स्थान आहे. वेदाचा अधिकार अखिल हिंदुमात्रास आहे, हें उच्च तत्त्व प्रसृत करून या समाजाने त्याअन्वये मागासलेल्या व अस्पृष्ट जातींनाहि समाजांत सामील करून घेऊन त्यांना यज्ञोपवीताचा अधिकार दिला व त्यांचें द्विजत्व मान्य केले; आणि शिक्षणाचा प्रसार सर्व जातींत करून त्यांच्यांत रोटी व बेटीव्यवहार सुरु करण्याचे धोरण आखले. हा समाज वर्ण मानतो पण समाजाच्या मतें वर्ण हा जन्मावरून ठरत नसून धंदा व वेदज्ञान यावरून ठरतो. आर्यसमाजाची स्थापना मुंबईस झाली; पण त्याचा खरा प्रसार पंजाबांत झाला. आजमितीला समाजाचे तीन लक्ष सभासद आहेत आणि त्याने प्रस्थापिलेल्या शिक्षणसंस्थांची संख्या तर सहज शंभरापर्यंत जाईल. समतेचा मंत्र जपून जातीय विषमता नष्ट करण्याच्या बाबतींत या समाजाने केवढे कार्य केले आहे, ते यावरून ध्यानीं येईल. (लाला हंसराजचरित्र- श्रीराम शर्मा)

समता आणि कर्तृत्व

 समतेचे महत्त्व समाजरचनेत किती आहे याचें मागें विवरण केलेच आहे. कोणच्याहि प्रकारची विषमता ही समाजाला घातकच ठरते; पण त्यांतल्या त्यांत जातिभेदामुळे आलेली विषमता ही समाजाचे सर्व कर्तृत्वच नष्ट करून टाकते. अशा समाजांत हीन जातीच्या लोकांना पराक्रम करण्यास स्फूर्ति येणें शक्य नसतें. आपण जे परिश्रम करणार, जो त्याग करणार, जी हानि सोसणार, तिचें पुरेपूर फल आपणांस मिळेल ही खात्री असेल तरच माणूस श्रम करण्यास उद्युक्त होतो. मी रणांत पराक्रम केला तर सेनापतीचें पद मला मिळू शकेल, विद्यावंत झालो तर धर्मपीठावर मी आरोहण करू शकेन, व कार्यक्षमता प्रगट केली तर राजा किंवा अध्यक्षहि होऊं शकेन- सारांश माझ्या गुणाप्रमाणे मला समाजांत स्थान निश्चित मिळेल ही भावना कर्तृत्वाची खरी प्रेरक असते. ब्रिटिशापूर्वीच्या भारतीय समाजांत, साधारणतः इ. स. १००० पासून पुढल्या सातशें-