पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७
समतेचा महामंत्र

त्या त्या जातींत करणें हा विष्णुबुवांच्या मते वर्णसंकर होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या पोटी जन्मलेल्या अपत्यांना केवळ जन्मावरून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र मानले, तर दुष्टाला गुरु मानल्याने किंवा भित्र्यास शूर मानल्याने जे तोटे होतात ते होतील असे त्यांनी सांगितले आहे.

बहुजन समाजाची मनःक्रांति-

 विषमता नष्ट करून समतेची प्रस्थापना करण्याचे गेल्या शतकांत जे प्रयत्न झाले त्यापैकी तीनचार प्रयत्नांची हकीकत वर सांगितली आहे. यापेक्षांहि जास्त महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा होय. वरील प्रयत्न हे उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या व पांढरपेशा वर्गातल्या लोकांनीं केलेले आहेत; पण बहुसंख्य असा जो बहुजनसमाज त्याच्यांतल्याच एका थोर समाजसेवकाने केलेल्या प्रयत्नाचे महत्त्व केव्हांहि जास्तच असणार. विषमव्यवस्थेत जो समाज दलित असतो त्याचा आत्मप्रत्यय शेकडो वर्षाच्या संस्कारानें नाहींसा झालेला असतो. आपण खरोखरच हीन आहो, आपल्याला मिळाली तीच पायरी योग्य आहे अशी त्याच्या मनाची भावना झालेली असते. कळत वा नकळत त्याने विषमतेला मान्यता दिलेली असते व त्यामुळे वरिष्ठ वर्गाला त्याचा छळ करण्यास मोकाट रान सांपडते. अशा वेळीं त्यांच्यांतलाच एक कार्यकर्ता- त्यांच्या जातीचा व विशेषतः स्वतःला त्यांचा म्हणवून घेण्यांत अभिमान बाळगणारा असा कार्यकर्ता निर्माण होतांच त्या समाजाच्या मनाचे मालिन्य नष्ट होते. आणि आपल्या श्रेष्ठत्वाची प्रतीति त्याच्या मनांत निर्माण होऊन विषमतेच्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास तो सिद्ध होतो. ज्योतिराव फुले यांच्या उद्योगाचे या दृष्टीनें विशेष महत्त्व आहे. स्वजनांचाच नव्हे तर पित्याचाहि विरोध सोसून या पुरुषानें शंभर वर्षो पूर्वीच्या काळी अस्पृश्यांची शाळा चालविली आणि त्यांच्यासाठीं स्वतःच्या घरापुढचा पाण्याचा हौद खुला केला. पण ज्योतिरावांचें खरें सामाजिक कार्य म्हणजे 'सत्यशोधक समाजाची' स्थापना हें होय. हिंदूंच्या विषमतेवर उभारलेल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध व जातिभेदाविरुद्ध असंतोष निर्माण करून त्याविरुद्ध खेड्यापाड्यांतील सर्व खालच्या वर्गापर्यंत बंडाची वृत्ति पसरून देण्याचे मोठे कार्य या समाजाने केले आहे.