पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
भारतीय लोकसत्ता

पार्लमेंट झाले आणि त्यांत सर्व जातीचे लोक पाठविले तर त्यामध्ये महारापेक्षां भट अधिक शहाणपणाने आपल्या देशांचे हिताविषयीं बोलतील काय ? अशा तऱ्हेची जहरी टीका करून ज्याच्या त्याच्या गुणकर्मावरून वर्ण ठरवावा असा उपदेश लोकहितवादींनी केला आहे. (शतपत्रे पृ. ५५, ६४, १२९, २१३)
 लोकहितवादींच्या नंतर समतेचें तत्त्व तितक्याच आग्रहानें सांगणारे गृहस्थ म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी हे होत. १८५९-६० च्या सुमारास लिहिलेल्या आपल्या 'वेदोक्तधर्मंप्रकाश' या ग्रंथांत त्यांनीं आपली हीं मतें निःसंदिग्ध शब्दांत मांडली आहेत. विष्णुबुवा हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेतच. पण लोकशाहीच्याहि पलीकडे जाऊन त्यांनीं शुद्ध कम्यूनिझमचाहि पुरस्कार केला आहे आणि समतेच्या तत्त्वाची पराकोटी गांठली आहे. 'प्रजा हें एक कुटुंब आहे. असे मानून सर्वांनी कष्ट करावे, व त्या कष्टांनी निर्माण झालेले धन राज्याच्या कोठारांत भरून ठेवावे व सर्व गांवकऱ्यांस पोटास लागेल तसे द्यावे' अशी व्यवस्था (राजनीति) त्यांनी सांगितली आहे. 'जातिभेद ही राजनीति बिघडल्याचीच निशाणी आहे.' 'जातिभेद, मूर्तिपूजा, व अनेकप्रकारचीं धर्माचीं ढोंगें यांचा नाश, 'सर्व प्रजा एक कुटुंब' या खऱ्या राजनीतीवांचून होणार नाहीं;' असे अस्सल मार्क्सवादी मत विष्णुबुवांनी सांगितले आहे. ही राजनीति स्वीकारली तर चोऱ्यामाऱ्या थांबतील एवढेच नव्हे तर युद्धेहि थांबतील, हाहि विचार त्यांनी सांगितला आहे. आणि शेवटीं अशी व्यवस्था केल्यास कायद्याची व शासनसंस्थेची गरजच रहाणार नाहीं असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. (सुखदायक राज्य प्रकरणी- निबंध)
 वेदोक्तधर्माच्या नवव्या प्रकरणांत, चातुर्वर्ण्य, जातिभेद यांविषयीं त्यांनी आपली मते सांगितली आहेत. त्यांचे असे मत आहे कीं, मुलामुलींना पांचव्या वर्षांपासून शिक्षण द्यावें. अकराव्या वर्षापर्यंत विद्या झाल्यावर त्यांच्या गुणावरून त्यांचा वर्ण ठरवावा व त्याअन्वये पुढे समवर्णीयांची लग्ने लावून द्यावीं व त्यांचा व्यवसायहि त्यावरूनच निश्चित करावा. गुणकर्माचा असा विचार न करतां केवळ ब्राह्मणाच्या किंवा क्षत्रियाच्या पोटी जन्म झाला म्हणून तरुणतरुणींना एकवर्णीय मानून त्यांचा विवाह