पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५
समतेचा महामंत्र

निर्मूलन व समतेची प्रस्थापना यांचें महत्त्व वर्णिले आहे. 'राज्यसुधारणा' या आपल्या पत्रांत त्यांनीं असा विचार मांडला आहे कीं, येथील लोकांनीं विलायतेतील राणीसाहेबांस अर्ज करून कळवावें कीं, 'सध्यांच्या राज्यपद्धतीपासून आमचा फायदा नाहीं. याकरितां हिंदुस्थानचे देशांत पार्लमेंट ठेवावें. दर एक शहरांतून व जिल्ह्यांतून दोनदोन असामी घेऊन त्या सर्वांस कौन्सिलांत बसवावे. हे जे लोक आणावयाचे ते सर्व जातीतील सारखे असावे. या लोकांत भट, गृहस्थ, शास्त्री, परभू, कुळंबी, मुसलमान इंग्रज इ. जे शहाणे असतील ते नेमावे. म्हणजे लोकांचा फार फायदा होईल. आणि राज्याची सुधारणा होऊन राजाचे अमलांत सुख काय व लोकसत्ताक राज्यांत सुख काय ते सहज दृष्टोत्पत्तीस येईल.
 जन्मनिष्ठ उच्चनीचतेवर त्या काळांत लोकहितवादींनी जेवढा भडीमार केला, तितका दुसऱ्या कोणी क्वचितच केला असेल; त्यांतहि त्यांनी एकंदर ब्राह्मण जातीवर जे इत्यार धरले त्यामुळे त्या समाजाची दृष्टि अंतर्मुख होऊन त्याला आत्मनिरीक्षणाचे जे बाळकडू मिळाले, ते अगदी आजपर्यंत आपला प्रभाव दाखवीत आहे. गेल्या शंभर वर्षात इतर जातींनी ब्राह्मणांना ज्या शिव्या दिल्या त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शिव्या ब्राह्मणांनी स्वतःच्या स्वतःलाच दिल्या आहेत. समाजांत जागृति कायम रहाण्यास अशा तऱ्हेचे कठोर आत्मपरीक्षण अवश्य असतें. व त्याचे सर्व श्रेय लोकहितवादींना आहे असें वाटते. 'जे ब्राह्मण ज्ञानशून्य आहेत. ते कैकाड्यासारखेच असून कैकाडी हे सुधारले तर ब्राह्मणासारखेच मानावें-' असें ते प्रतिपादितात. अर्थ न समजतां वेदांचे अध्ययन करणारे जे ब्राह्मण ते त्यांना केवळ जनावरें वाटतात. 'ब्राह्मणांनी आपल्या मूर्ख समजुती सोडून देऊन लोकांस सारखे मानून विद्या शिकण्याचा हक्क सर्वांना आहे, हें त्यांनी कबूल करावें' असा उपदेश त्यांनी केला आहे. 'चार ब्राह्मण लावून अभिषेक करावा त्यापेक्षां चार मजूर लावून रस्ता नीट करावा हें चांगले, कारण ती लोकहिताची मजुरी आहे. यास्तव स्नानसंध्या करण्यांत पुण्य नाहीं.' असली सनातनी लोकांना आजहि न पेलणारी मतें त्यांनी सांगितली आहेत. 'भटांत व अतिशूद्रांत मला इतकेंच अंतर दिसते की, एक बोलता राघू व एक न बोलता राघू; परंतु ज्ञान एकच.' जर या देशांत