पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
भारतीय लोकसत्ता

पावाचा एक तुकडा खावयास देत. अशा रीतीने सभासद झालेल्या लोकांचें वर्षातून बऱ्याच वेळां सहभोजनहि होत असें. पण हे सर्व गुप्तपणे चाले. समाजांत व्याख्यानरूपानें वा लेखरूपाने या संस्थेचा मतप्रचार चालत नसे. दादोबांचे नॉर्मल क्लासमधील शिष्य आपापल्या गांवीं जाऊन शिक्षक म्हणून काम करूं लागल्यावर आपल्या परमहंस मताचा प्रचार करीत. पण यापेक्षां जास्त व्यापक रूप या प्रयत्नाला आलें नाहीं. (दादोबा पांडुरंग चरित्र, प्रियोळकर, पृ. २४९-२८२.)
 भारतीय समाजांतील जन्मनिष्ठ विषमता नष्ट करून समतेच्या पायावर त्याची पुनर्घटना केली पाहिजे, हा विचार इतर अनेक क्रान्तिकारक विचाराप्रमाणेंच राजा राममोहन रॉय यांनी सांगितला आहे. मात्र या क्षेत्रांत त्यांनी जोराची चळवळ केली नाहीं. ती पुढे केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. त्यांनी ब्राह्मसमाजामार्फत अनेक भिन्नजातीय विवाह घडवून आणले आणि त्यांना मान्यता देण्यासाठी १८७२ साली सरकारकडून तसा कायदाहि करवून घेतला. याच सुमारास पंडित सीतानाथ यांनीहि जातिभेदनाशाची चळवळ जोरांत सुरू केली होती. आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या आड येणाऱ्या ज्या अनेक रूढि हिंदुधर्मात आहेत, त्यांत जातिभेद ही प्रमुख आहे असें त्यांचे निश्चित मत होते. जातिबंधनांमुळे व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत नाहीं, म्हणून आपल्या समाजरचनेत आमूलाग्र क्रान्ति झाली पाहिजे असे ते सांगत. त्यांच्या मते मूर्तिपूजा, बलिदान व चातुर्वर्ण्य हा हिंदुधर्माचा पाया होय. तेव्हां एकतर तो पाया उखडून काढला पाहिजे किंवा ब्राह्मांनी त्यांतून बाहेर तरी पडले पाहिजे असे प्रतिपादन ते करीत. (नवयुगधर्म- फडके पृ. ६६२-६७)
 गेल्या शतकांतील बहुतेक सर्वच समाजसुधारकांनीं जातिभेदावर व विषमतेवर हल्ला केला असला तरी त्यांत लोकहितवादी यांनी केलेल्या हल्ल्याला आपल्या दृष्टीनें विशेष महत्त्व आहे. इतर सुधारकांनी कोणीं मानवतेच्या दृष्टीनें कोणीं भूतदयेच्या दृष्टीनें तर कोणीं राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीनें जातिभेदाचा विचार केला आहे. आणि त्या विचारसरणींना महत्त्व आहे यांतहि शंका नाहीं. पण लोकहितवादींचा विशेष निर्देश करण्याचे कारण असे की त्यांनी लोकशाहीचे तत्त्व प्रतिपादून त्यासाठी म्हणून जातिभेदाचें