पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१
मानवत्वाची प्रतिष्ठा

 असल्या अधम व हीन धर्माचे जे अनुयायी त्यांच्यांत लोकसत्ता तर राहोच, पण मानवी कर्तृत्वाचा निदर्शक असा कोणचाच गुण निर्माण होणे शक्य नव्हते आणि पाश्चात्य विद्येनें ज्यांना नवी दृष्टि प्राप्त झाली होती, अशा सर्व धर्मवेत्यांना हीच भयावह गोष्ट प्रथम जाणवली. राममोहन, केशवचन्द्रसेन, ईश्वरचन्द्र विद्यासागर, पंडित सीतानाथ, दादोबा पांडुरंग, ज्योतिबा फुले, लोकहितवादी, सर सय्यद अहंमद, रानडे, भांडारकर, स्वामी दयानंद, लाला हंसराज, आगरकर, विवेकानंद इ. गेल्या शतकांतील सर्व प्रमुख समाजनेते हे प्रामुख्याने धर्मसुधारक होते त्याचें कारण हे आहे. प्रत्येकाने पहिला घण त्या कर्मकांडप्रधान जडधर्मांवर घातलेला आहे. त्यांच्या धर्मसुधारणेचे लक्षण एकच होते. मानवाला देहप्रधान गणून आधींच्या जडधि अशा धर्मपंडितांनी सांगितलेला हीन व अपवित्र असा आचारधर्म नष्ट करून त्या जागीं त्याच्या मनाची, बुद्धीची, आत्म्याची प्रतिष्ठा वाढविणारा तात्त्विक धर्म प्रस्थापित करणें हेंच ते लक्षण होय. धर्म हे मनाचे संस्कार आहेत देहाचे नव्हेत. धर्म म्हणजे मनोजय, धर्म म्हणजे आत्मसंयमन, धर्म म्हणजे भूतदया, धर्म म्हणजे श्रद्धा, भक्ति, प्रेम हा महनीय विचार त्यांना सांगावयाचा होता; आणि वेद, उपनिषदे, गीता, आवेस्ता, कुराण या आपल्या आदि धर्मग्रंथांच्या आधाराने त्यांनीं तो सांगितला. मधल्या काळांत मानलेला आचारधर्म हा मूळवृक्षावर माजलेल्या बांडगुळाप्रमाणे होय, हेंच मत राममोहन, स्वामी दयानंद, विवेकानंद, खरशेडजी रुस्तुमजी कामा, सर सय्यद अहंमद या गेल्या शतकांतील प्रमुख धर्मसुधारकांनी सांगितले आणि धर्म ही मुख्यतः मानसिक उन्नति आहे आणि तिच्यासाठी विवेक, बुद्धि, तर्क यांचाहि उपयोग श्रद्धा, भक्ति यांचे बरोबर झाला पाहिजे, हा विचार आपापल्या सधर्मीयांच्या मनावर बिंबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
 आणि यांतच कळून वा नकळून त्यांनी लोकायत्त शासनाच्या सिद्धतेला बहुमोल साह्य केले आहे. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स येथील लोकसत्ताकांचा इतिहास आपण पाहिला तर मानवाच्या मनाभवतीं असलेल्या अनेक जाचक अशा शृंखला तुटून पडल्यावांचून ते मन लोकायत्त शासनाची अवघड जबाबदारी पेलण्यास समर्थ होऊं शकत नाहीं, हा विचार त्या इतिहासांत