पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
भारतीय लोकसत्ता

अनेक वेळां आपणांस दिसून येईल. त्या अनेक शृंखलापैकीं जड आचारधर्मांची शृंखला अत्यंत जाचक असते. विज्ञानाच्या साह्याने ती शृंखला त्या त्या देशांतील पंडितांनी तोडून काढली, तेव्हांच त्यांचे पाऊल पुढे पडलें. आपल्या भरतभूमीत येथल्या पूर्वसूरींनीं नेमकी याच स्वरूपाची धर्मक्रान्ति घडवून आणली आणि त्यायोगे मानवाच्या मानवत्वाची प्रतिष्ठा वाढवून भारतीय लोकसत्तेचा पाया घातला.




प्रकरण तिसरें
समतेचा महामंत्र

 लोकसत्ता हें अत्यंत क्रांन्तिकारक असे तत्त्व आहे. त्याच्या आगमना- बरोबर समाजाच्या सर्व रचनेत आमूलाग्र परिवर्तन घडून येत असते. धर्म, नीति, शिक्षण, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था या क्षेत्रांतील कोणचीहि संस्था लोकायत्त युगांत जुन्या रूपांत टिकूं शकणार नाहीं, आणि तशी ती टिकून राहिली तर लोकसत्ता यशस्वी होणार नाहीं. जुन्या काळच्या या संस्थांनी त्या काळच्या मानवी मनावर शेकडो वर्षे संस्कार करून त्या मनाची एक विशिष्ट घडण बनविलेली असते, आणि ती घडण लोकसत्तेस सर्वस्व प्रतिकूल असते. 'लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नसून लोकशाही म्हणजे प्राधान्याने एक मनोवृत्ति, एक विशिष्ट विचारप्रणाली आहे.' हें विड्रोविल्सन यांचे वचन मागें एकदां उद्धृत केलें आहे. ही जी त्यांनी सांगितलेली मनोवृत्ति ती जुन्या पीठिकांतून निर्माण होणे शक्य नसते. जुन्या पीठिकांचे संस्कार घेऊन त्याच धोरणाने कार्यप्रवृत्त झालेली माणसे लोकशाही कधींच यशस्वी करूं शकणार नाहींत. लोकशाही यशस्वी होण्यास माणसांची नवीनच पिढी निर्माण होणें अवश्य असते. नव्या संस्था व नवीन समाजरचना यांना नव्याच माणसांची आवश्यकता असते. हा नवा माणूस गेल्या शतकांत कसा निर्माण झाला व गेल्या शतकांतील विचारवेत्त्यांनी त्याच्या स्वागताची तयारी कशी केली तें आपण पहात आहों, ते पहातांना पहिली