पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
भारतीय लोकसत्ता

देह म्हणजे मी अशी भावना ठेवल्यामुळे मनुष्य मोक्षाला अपात्र ठरतो; अशा प्रकारचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान एका तोंडाने सांगणाऱ्या या धर्मवेत्त्यांनी दुसऱ्या तोंडाने मानवाला जो धर्म सांगितला तो फक्त त्याचा जड देहच विचारात घेऊन सांगावा आणि नुसत्या स्पर्शाने किंवा सांवलीने त्याला पतित मानण्यास प्रवृत्त व्हावे यापरता जास्त अधःपात तो काय ? आणि जेथें धर्मवेत्तेच असे हीन, पतित व प्रज्ञाहत होते तेथे मानवाची प्रतिष्ठा कशी सुरक्षित राहणार !
 न्या. रानडे यांच्या सर्व सुधारणेचे 'मानवी प्रतिष्ठेचें पुनरुज्जीवन' हें आदिसूत्र होतें. 'आपल्या अधःपाताचे मूल कारण म्हणजे आपणांवरची सर्व बंधने हीं विवेकबंधने नसून तीं बाह्य व जड अशी बंधने आहेत, हें होय. यामुळे आपली मनें बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन, आत्मसंयम यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला आलीच नाहीं' असे उद्गार त्यांनी कलकत्याच्या दहाव्या सामाजिक परिषदेत भाषण करतांना काढले आहेत. (मिसलेनियस रायटिंग्ज् पृ. १९२-९३) आणि श्रेष्ठ मानवी प्रतिष्ठेची जाणीव हाच या अधःपातावर उपाय आहे, असा संदेश सांगितला आहे. वरील ग्रंथांत त्यांचीं जीं सामाजिक परिषदांत झालेली दहाबारा भाषण दिलीं आहेत, त्यांत तीनचार ठिकाणी या तत्त्वाचा त्यांनी उल्लेख केला आहे. यावरून त्यांना त्याचे किती महत्त्व वाटत होते कळून येईल.

मानवत्वाचा अवमान

 ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळांत येथे समाजरचनेचीं जीं तत्त्वें मान्य व रूढ झाली होतीं, त्यांतील जवळजवळ प्रत्येक तत्त्व मानवी प्रतिष्ठेला घातक असेंच होर्ते. कलियुगाची कल्पना, जन्मनिष्ठ उच्चनीचता, दैववादाचे किंवा नियतिवादाचे तत्त्व, संसाराविषयींची व विशेषतः स्त्रियांविषयींची उपेक्षाबुद्धि, तर्कांची अवहेलना, शब्दप्रामाण्य, यांतील प्रत्येक तत्त्व मानवाच्या स्वत्वाची पायमल्ली करणारे आहे आणि याच्या जोडीला या सर्वांच्या आधाराने उभारलेलें तें कर्मकांड, तो अत्यंत अमंगळ असा आचारप्रधान धर्म !