पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९
मानवत्वाची प्रतिष्ठा

श्रेष्ठ मानवी कर्तृत्व निर्माण होणे कालत्रयीं शक्य नाहीं असा एखाद्यानें तर्क बांधला तर इतिहास सर्वतोपरी त्याचा पाठपुरावाच करील.

तर्कशून्य बंधने

 मानवी समाजाचे व्यवहार सुरळित चालावयाचे तर त्यासाठी बंधनें असणें अवश्य आहे, पण त्या बंधनांना कांहीं तर्काचा, उपयुक्ततेचा, सद्हेतूचा पाठिंबा असला पाहिजे. तो पाठिंबा जेव्हां नसतो आणि धर्मसिंधु, निर्णयसिंधु या ग्रंथांतल्याप्रमाणे हीं बंधनें जेव्हां हेतुशून्य, अर्थशून्य, तर्कशून्य व केवळ धर्माज्ञेवर तगणारी अशीं असतात त्या वेळीं तीं मानवी प्रतिष्ठेला अत्यंत घातक अशीं ठरतात. या बंधनांनी मानवाचे मानवत्वच संपुष्टांत येते. एखाद्या सुतावर पाय पडला, एखादा पाण्याचा थेंब अंगावर पडला, कोणाची सावली अंगावर पडली किंवा कसल्या तरी धान्याचा कण पोटांत गेला, किंवा नुसता कोणाचा शब्द कानावर आला तरी तेवढ्यामुळे मानव पतित ठरावा, अमंगळ ठरावा आणि त्याबद्दल त्याला प्रायश्चित्त घेणे भाग पडावे अशा प्रकारच्या धर्माज्ञा प्रचलित करणाऱ्यांच्या मनांत मानवी जीवनाच्या मूलभूत महत्त्वाची किती दखल असेल तें सहन कळून येईल. मानव म्हणजे त्याची बुद्धि, त्याचे मन, त्याचा आत्मा, त्याच्या निष्ठा, त्याची श्रद्धा, त्याची विचारसरणी, त्याच्या आशा आकांक्षा हा सर्व जगतांतल्या तत्त्ववेत्यांना मान्य असलेला सिद्धान्त वरील प्रकारच्या धर्मपंडितांनी पायदळी तुडविला आहे. लोकसत्तेच्या कल्पना त्यांना माहीत नसतील, पण देहबुद्धि ही खोटी आहे, मानव म्हणजे मानवाचा देह नसून मानव म्हणजे अंतरांतील आत्मा होय, हा वेदान्तसिद्धान्त तर त्यांना माहीत होता ना ? पण तो धर्मग्रंथांत होता. प्रत्यक्षांत त्यांच्या मतें मानव म्हणजे त्याचा देह, त्याचॆं जड शरीर ! कारण त्याला केवळ एका सुताचा स्पर्श झाला कीं, तो मानव पतित होतो आणि केवळ त्या शरीरावर कांहीं संस्कार केले की तो शुद्ध होतो. मानवाच्या प्रतिष्ठेचा उपमर्द तो हाच. ही विचारसरणी मानवाला देहप्रधान मानते, पशुवत् लेखते. ती मन, बुद्धि, श्रद्धा, आत्मा या मानवत्वाच्या उच्च घटकांची दखलच घेत नाहीं. मनुष्य म्हणजे मनुष्याचा आत्मा, देह नव्हे,
 भा. लो....४