पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
भारतीय लोकसत्ता

नाहीं. म्हणूनच 'मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति' हे सर्वात श्रेष्ठ असें तत्त्वरत्न होय असे वर म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांनी अमेरिकेतील उच्च शिक्षणाची पुनर्घटना करण्यासाठी १९४८ सालीं एक समिति नेमली होती. तिचें इतिवृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यांत 'व्यक्तिजीवनाचे स्वयंसिद्ध महत्त्व व मानवी जीवनाची प्रतिष्ठा यांवरील दृढ श्रद्धा हेंच लोकसत्तेचें मूल महातत्त्व होय, आणि उच्च शिक्षणांत त्याचा प्रामुख्याने अंतर्भाव झाला पाहिजे' असे आग्रहाने सांगितले आहे. (संडे न्यूज १२ | १२ | ४८) नेमक्या याच तत्त्वाचा उपदेश न्या. रानडे यांनी आपल्या सामाजिक परिषदांतील भाषणांतून केला आहे.

 मानवाच्या मानवत्वाची ही जी स्वयंसिद्ध प्रतिष्ठा तिच्यावर समाजनेते श्रद्धा ठेवतात कीं न ठेवतात, ती त्यांना मान्य आहे कीं नाहीं, यावरच त्या त्या समाजांतील बंधने, नियंत्रण, नियमने हीं सर्वस्वी अवलंबून असतात. आणि या दृष्टीने विचार करून १८५० च्या पूर्वीच्या अनेक शतकांत आपल्या देशांत जीं समाजबंधने रूढ होतीं त्यांचे परीक्षण केलें तर असें दिसून येते की त्या बंधनांच्या प्रणेत्यांना मानवी जीवनाची प्रतिष्ठा मान्य तर नव्हतीच पण ती त्यांना ज्ञातहि नव्हती. त्या काळीं भारतीय समाजांतील सर्व श्रेष्ठ व कनिष्ठ जातींमध्ये व्यक्तींच्या सर्व क्षेत्रांतील व्यवहारावर जीं अनंत बंधने होतीं त्यांचा नुसता विचार सुद्धां आज आपल्याला दुःसह वाटतो. स्नानाविषयीं नियम, भोजनाविषयीं नियम, शौचाविषयीं नियम, मुखशुद्धिविषयीं नियम, निजण्यासंबंधींचे निर्बंध उठण्यासंबंधींचे निर्बंध, कपड्यासंबंधींचे निर्बंध, जन्माच्या आधींच बंधनें, मरणानंतरची बंधने, तिथि, वार, नक्षत्र, महिना यांविषयींचीं नियंत्रण, विवाहविषयक आज्ञा, जातिभेद- विषयक आज्ञा, परस्परव्यवहाराविषय आज्ञा, प्रवास, परदेशगमन, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, स्पर्श यांचे विधिनिषेध– हे सर्व निर्बंध आणि त्यांच्या अल्पशा भंगाबद्दलचीं तीं शेकडों प्रायश्चित्तें हीं मानवी प्रतिष्ठेला इतकीं उपमर्दकारक आहेत, मानवाच्या व्यक्तित्वाचा त्यामुळे इतका अवमान होतो, आणि त्या बंधनांच्या प्रणेत्यांची मानवाबद्दलची तुच्छताबुद्धि त्यांमुळे इतकी स्पष्ट होते कीं, असल्या समाजांत लोकशाही तर लांबच राहिली, पण कोणत्याहि प्रकारचे