पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७
मानवत्वाची प्रतिष्ठा

 हा सर्व इतिहास हिंदु समाजांतील जागृतीचा आहे. पण अगदीं याच मार्गाने मुसलमान, पारशी हेहि समाज जागृत झाले होते व असेच कार्यप्रवृत्तहि झाले होते. सर सय्यद अहंमद यांनी पाश्चात्य ज्ञानाच्या प्रसारासाठी १८६३ साली 'सायंटिफिक् सोसायटी' स्थापन केली आणि १८७१ साली 'सोशल रिफॉर्मर' हे पत्र मुसलमान समाजाच्या सुधारणेच्या हेतूनें चालू केलें. १८७७ सालीं त्यांनी आपल्या प्रसिद्ध 'अलीगड विद्यापीठाची' स्थापना केली. १८५१ साली 'राहनुमाई मझदेस्तन' ही पारशी समाजाची धर्मसुधारक सभा स्थापिली गेली. दादाभाई नौरोजी, वाच्छा, नौरोजी फर्दूनजी ही मंडळी या सभेच्या प्रवर्तकांत अग्रेसर होती; 'रास्त गोफ्तार' हें पत्रहि तिनें चालू केले.

मानवत्वाची प्रतिष्ठा

 मागें सांगितलेच आहे कीं, गेल्या शतकाच्या पूर्वार्धातच या देशांत पाश्चात्य संस्कृतीच्या आगमामुळे पूर्वकाळच्या समुद्रमंथनापेक्षांहि जास्त वेगानें तात्त्विक विचारांचे मंथन सुरू झालें होतें आणि त्या पौराणिक मंथनांतून जशीं महार्हरत्नें निघालीं तशींच या अर्वाचीन वैचारिक मंथनांतूनहि अनेक तत्त्वरूप रत्नें निघाली. या रत्नांतील अत्यंत श्रेष्ठ व लोकसत्तेच्या दिव्य तत्त्वाची प्रभा सर्वत्र विकिरित करणारें रत्न म्हणजे 'मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति' हे होय.
 समाजांतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला स्वतंत्र महत्त्व आहे, केवळ समाजाचा एक घटक या दृष्टीने तिच्याकडे पहावयाचे नसून एक स्वत: सिद्ध व स्वयंपूर्ण मानव या दृष्टीनेच तिच्याकडे पाहिले पाहिजे, समाजरचनेचीं तत्त्वे दुसऱ्या कोणत्या तरी पारलौकिक दृष्टीने ठरवून मग त्यांत जेथें कोठें चौकटींत वा सापटीत मानव बसेल तेथे त्याला बसवावयाचा असे धोरण न अवलंबिता मानवाचे सुख, त्याचा गुणविकास, त्याच्या व्यक्तित्वाचा उत्कर्ष हेंच मूलभूत ध्येय ठेवून त्याला अनुसरूनच समाजरचनेंची तत्त्वें ठरविली पाहिजेत हा जो विचार तो म्हणजे लोकशाहीचा आदिसिद्धांतच आहे. पण मानवाच्या जीविताला एक विशेष प्रतिष्ठा आहे, ही जाणीव झाल्यावांचून या सिद्धांताला कोणी मान देणार