पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
भारतीय लोकसत्ता


वृत्तपत्रे- दुसरें लक्षण

 संस्थांप्रमाणेच वर्तमानपत्रे व एकंदर नियतकालिके हीं पण सार्वजनिक जीवनाची प्रतीकेंच आहेत. राष्ट्रपुरुषाच्या शरीरांत विचारांचे अभिसरण कायम चालूं ठेवण्याचे काम ही वृत्तपत्रेंच करीत असतात. अर्वाचीन काळांत वृत्तपत्रावांचून सामुदायिक जीवन क्षणभरहि चालू राहाणार नाहीं. अशा या वृत्तपत्रांचा उदय व वाढ वर निर्देशिलेल्या काळांतच झालेली आहे. राजा राममोहन रॉय यांच्या संस्थेचे 'बंगाली हेरल्ड' हें मुखपत्र होतें. १८४० च्या सुमारास कलकत्त्यास 'प्रभाकर' नांवाचे एक पत्र ईश्वरचंद्र गुप्त यांनी काढले होते. उमेशचंद्र बॅनर्जी यांनी १८६२ साली बंगाली' हे पत्र सुरू केले. हेंच पत्र पुढे १८७८ साली सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी घेतले व त्याच्या साह्याने बंगाल हलवून सोडला. बाबू शशिकुमार घोष यांच्या 'अमृतबझार पत्रिके' चा जन्म १८६८ साली झाला होता. महाराष्ट्रांत बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी १८३२ साली 'दर्पण' नांवाचे पाक्षिक काढले आणि पुढे १८४० साली भाऊ महाजन यांनीं 'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक एकट्यांनीच चालू केले. पुढे १८४९ साली 'ज्ञानप्रकाश' १८६२ साली 'इंदुप्रकाश' १८६४ साली मंडलिकांचें 'नेटिव्ह ओपिनियन' १८७७ साली कृष्णराव भालेकरांचे 'दीनबंधु' हीं पत्रें निघालीं आणि १८८१ या साली 'केसरी' व 'मराठा' या पत्रांचा जन्म झाला. १८७९ साली सुब्रहाण्य अय्यर यांनी मद्रासला 'हिंदु' हें पत्र चालू केलें. डॉ. पट्टाभींच्या मतें मद्रास प्रांतांत सार्वजनिक जीवन या पत्रामुळेच निर्माण झाले. १८८२ साली अय्यर यांनीच 'स्वदेश मित्रम्' हें दैनिक चालू केले. प्रयागचे पंडित अयोध्यानाथ यांच्या नेतृत्वाने १८७९ साली 'इंडियन हेरल्ड' हें पत्र निघाले होते आणि 'हिंदुस्थान' हें पत्र हातीं घेऊन १८८७ सालीं मालवीयजींनी आपले कार्य चालू केले होते. स्वामी दयानंदांपासून स्फूर्ति पावलेले लालाहंसराज यांनी 'री जनरेटर ऑफ आर्यावर्त' या पत्राच्या साह्याने १८८१ सालींच जागृतीच्या कार्यास प्रारंभ केला होता.