पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५
मानवत्वाची प्रतिष्ठा

आला. तो सर्व इतिहास आपणांस पुढे पहावयाचा आहे. आतां प्रथम भिन्नभिन्न प्रांतांत नानाविध संस्थानीं हें सामुदायिक जीवन निर्माण कसें केले आणि त्या वेळीं त्यांच्यापुढे प्रधान उद्दिष्ट कोणचें होतें याचा विचार करूं.
 या जीवनाच्या प्रधान प्रेरणा पाश्चात्यांकडून आल्या याचें प्रत्यक्ष गमक हेंच की, ज्या प्रांतांत पाश्चात्यविद्येचा प्रसार प्रथम झाला तेथे या नवजीवनास प्रथम प्रारंभ झाला. अर्वाचीन भारताच्या बहुतेक सर्व जीवनाच्या क्षेत्रांतील आदिशक्तींचा उदय बंगालमध्ये झालेला आहे. राजा राममोहन रॉय यांनी धर्मसुधारणेसाठी ब्राह्मसमाजाची स्थापना केली (१८२८) आणि त्यांतूनच पुढे देवसमाज, नवविधान इ. संस्था निघाल्या. प्रसन्नकुमार ठाकूर यांनी स्थापन केलेल्या कलकत्त्याच्या ब्रिटिश इंडिया असोसिएशनचा (१८५१) उल्लेख वर आलाच आहे. अशा रीतीने एकदां प्रारंभ झाल्यानंतर सर्व प्रांतांत पुढील पन्नाससाठ वर्षात शेकडों संस्था भराभर उदयास आल्या. दादोबा पाडुरंग यांनी १८४३ साली स्थापन केलेली मानवधर्मसभा, १८५० साली स्थापिलेली परमहंससभा, त्यांचेच बंधु डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी स्थापिलेला प्रार्थनासमाज (१८६७); महात्मा जोतिराव फुले यांचा सत्यशोधकसमाज (१८७३); स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईस स्थापन केलेला, पण पंजाबांत दृढमूल झालेला आर्यसमाज (१८७५); संयुक्त प्रांतांतील भार्गवसभा, पंजाबांतील आगरवाल व जाट यांच्या सभा, रजपुतान्यांतील माळीसभा, जैतपूरची महाजनसभा, बल्लारीचा सन्मार्गसमाज, गाझीपूर, मीरत, अजमीर येथील सभा, सिंधमधील संध असोसिएशन, अयोध्या प्रांतांतील कायस्थ सभा- या सर्व सभा सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्याचा हेतूने प्रस्थापित झाल्या होत्या. वर उल्लेखिलेली कलकत्त्याची ब्रिटिश इंडिया असोसिएशन, मुंबईची बाँबे असोसिएशन, मद्रासची मद्रास नेटिव्ह असोसिएशन, कलकत्त्यास १८७६ साली निघालेली इंडियन असोसिएशन, पुण्याची सार्वजनिक सभा (१८७२) व मद्रासची महाजनसभा या राजकीय संस्था होत्या. ज्ञानप्रसारकसभा, स्टूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, हिंदू युनियन क्लब इ. संस्था ज्ञानोपासनेच्या उद्देशाने निघाल्या होत्या.