पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
भारतीय लोकसत्ता

विषयांपलीकडे, कोणी करीत नसत. येथे सर्वत्र व्यक्ति रहात होत्या. येथे समाज होता हें म्हणणे सत्याला फार सोडून होईल.
 पाश्चात्य संस्कृतीच्या व विशेषतः ब्रिटिश विद्येच्या प्रसारामुळे या भरतभूमींत जें मन्वंतर झाले त्याचे पहिले लक्षण हें कीं या भूमींत फार काळ लुप्त झालेले सामुदायिक किंवा सार्वजनिक जीवन पुन्हां अवतीर्ण झालें. आणि त्याचे प्रत्यक्ष कारण हेच की, येथें विचारी लोकांनी समाजाच्या भवितव्याचे चिंतन व तत्त्वमंथन करण्यास प्रारंभ केला आणि त्यामुळे गेले शतक संपण्याचें आतच या देशाच्या जवळजवळ प्रत्येक प्रांतांत धर्मकारण, समाजकारण, राजकारण, वाङ्मय, शिक्षण, इतिहास, विज्ञान इ. क्षेत्रांत कार्य करून आपल्या समाजाला आपापल्या दृष्टीने वळण लावण्याच्या हेतूने शेकडो संस्था निर्माण झाल्या व त्यांनीं भरतखंडाचे रूप अगदीं अल्पावकाशांत आपादमस्तक पालटून टाकलें.
 १८८५ सालीं काँग्रेसची स्थापना झाली व दोनच वर्षांनी सामाजिक परिषदहि निर्माण झाली. सुमारे ८/१० वर्षांत म्हणजे १८९५ पर्यंत या दोन्ही संस्थांचे आसन स्थिर होऊन त्यांच्या रूपरेषाहि थोड्याफार निश्चित झाल्या आणि त्यामुळे या भूमित अखिल भरतखंडाचे सामुदायिक जीवन निर्माण झालें. अखिल भरतभूचें धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक- सर्व तऱ्हेचे प्रश्न एकच आहेत. सर्व प्रांतांतील लोकांची सुखदुःखें, आशा- आकांक्षा, रागद्वेष एकच आहेत, व सर्व भारतीयांना सारख्याच आपत्तीशीं झुंजावयाचे आहे अशी अखिल भारतीय भावना, अखिल भारताच्या ऐक्याची व त्याबरोबरच पृथगात्मतेची भावना त्या सुमारास निर्माण झाली. पण हा जो अखिल भारतीय सार्वजनिक जीवनाचा महासिंधु निर्माण झाला तो कांहीं एकदम निर्माण झाला नाहीं. त्यापूर्वी सुमारे ६०/७० वर्षे लहान- लहान गांवांतून त्या जीवनाचे बिंदु तयार होत होते. मोठमोठ्या शहरांतून त्यांचे जलौघ वाहूं लागले होते आणि भिन्नभिन्न प्रांतातून सामुदायिक जीवनाच्या सरिताहि त्या महासिंधूच्या रोखाने मार्ग क्रमूं लागल्या होत्या. या सर्वाचाच १८८५ ते ९५ या काळांत संगम होऊन भारतीय सामुदायिक जीवनाचा महासागर निर्माण झाला आणि पुढील पन्नास वर्षात त्याला उधान येऊन त्यांतूनच शेवटीं लोकसत्तेचा अमृतकलश भारतीयांच्या हातीं