पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३
मानवत्वाची प्रतिष्ठा

पांचपन्नास वर्षांत येथल्या समाजधुरीणांच्या चित्तांत विचारांच जे तुफान माजलें, पुराणकालीं झालेल्या समुद्रमंथनापेक्षां सुद्धां जास्त प्रबल असें जें तत्त्वमंथन येथे सुरू झाले, नव्या विचारांच्या तीव्र उष्णतेमुळे येथल्या समाजाचीं कवचें उकलून ज्वालामुखीसारखे येथे जे स्फोट होऊं लागले, समाज, धर्म, नीति, अध्यात्म या क्षेत्रांत युगानुयुगे अविचलित मानलेले पहाडासारखे सिद्धांत एकदम गडगडल्यामुळे येथे जे प्रलयकंप अनुभवास येऊं लागले ते विचारांत घेतले म्हणजे मागल्या काळीं तत्त्वमंथन, मनन, समाजाच्या भवितव्याविषयींची चिंत्ता ही शून्यप्रायच होती हें कोणालाहि मान्य होईल. १८२५ ते १८८५ या पहिल्या काळखंडांत राजा राममोहन रॉय, ईश्वरचन्द्र विद्यासागर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, दादोबा पांडुरंग, ज्योतिराव फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर, टिळक, पंडित अयोध्यानाथ, स्वामी दयानंद, लाला हंसराज, लाला लजपतराय, आनंदाचार्लू, सुब्रह्मण्य अय्यर इ. अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना व विचारवेत्त्यांना गेल्या हजार वर्षात जे प्रश्न येथल्या लोकांना प्रतीत झाले नाहींत म्हणून वर सांगितले तेच नेमके प्रतीत झाले. आणि त्यामुळे आपल्या समाजाचे अत्यंत अवनत रूप पाहून त्यांच्या पायाखालची धरणी हादरून गेली. पूर्वीच्या काळी वर निर्देशिलेले कांहीं अपवाद वगळतां या तऱ्हेनें पायाखालची धरणी हादरत नसे.
 आणि याचे प्रधान कारण म्हणजे सामुदायिक जीवनाची कल्पनाच त्या समाजांतून नष्ट झाली होती हें होय. येथें माणसें फुटीर अशा गटांनी भिन्नभिन्न कोंडाळ्यांतून आपापले कोंझें जीवन जगत होती. ब्राह्मणाला अंत्यजाच्या बऱ्यावाईटाची चिंता तर नव्हतीच, पण अखिल ब्राह्मण- समाजाच्या उत्कर्षाची चिंता तो वहात होता असेही नव्हतें. आणि हीच गोष्ट इतर जातींची होती. लग्नकार्य, बहिष्कार, ग्रामण्य येवढ्यापुरतेंच जातीय जीवन येथे होते. इंग्रज येथे आला तर तो कोण आहे हे जाणावें, त्याची विद्या हस्तगत करावी अशी चिंता ब्राह्मणांना कधींच लागली नव्हती आणि त्याचे युद्धशास्त्र अवगत करून घ्यावे असे क्षत्रियांना कधी वाटले नव्हतें. म्हणजे अखिल समाजाची चिंता येथे नव्हती येवढेच नव्हे तर जातींचें जें मर्यादित सामुदायिक जीवन त्याचीहि चिंता, कांहीं ठराविक