पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४७
उपसंहार

ताण वाढत चालल्यामुळे या सामन्यांतील ही रस्सी आतां अगदी मध्यरेषेवर येऊन तंग होऊन राहिली आहे. या वेळीं आतां हिंदुस्थान आपले बळ कोणच्या बाजूनें टाकणार यावर या जगांतल्या अभूतपूर्व सामन्याचा निर्णय अवलंबून आहे.
 आजपर्यंत मानवानें आपल्या उत्कर्षासाठी अनेक धर्म प्रस्थापित केले. अनेक संस्कृति निर्माण केल्या. कलांची उपासना केली. आणि ज्ञानविज्ञानांचें संवर्धन केले. या सर्वांचे सारभूत तात्पर्य ज्या एका महाशब्दांत सांगतां येईल तो शब्द म्हणजे व्यक्तित्व. धर्म, संस्कृति, कला, विज्ञान हे सर्व मानवाच्या व्यक्तित्वाचेच अविष्कार आहेत. आणि लोकसत्ता ही त्या व्यक्तित्त्वाच्या परिपालनासाठी, संवर्धनासाठी व परिणतीसाठी निर्माण झालेली जीवनपद्धति आहे. म्हणूनच लोकसत्ता हा सर्व धर्मामध्ये अत्यंत श्रेष्ठ धर्म होय, असे म्हटल्यास त्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं. जुन्या धर्मात जीं महनीय तत्त्वें सांगितली आहेत, तीं सर्व या महाधर्माच्या अभ्यंतरांत सहज समाविष्ट होतात. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, शिक्षण हक्काने मिळाले पाहिजे. प्रजेच्या कल्याणासाठीच शासनाचा जन्म झालेला आहे. गरीब-श्रीमंत असा भेद न करितां न्यायदेवतेनें सर्वांवर समदृष्टि ठेवली पाहिजे. सत्य हे सर्वात श्रेष्ठ बळ होय. पाशवी बळ हे बळ नव्हे. सर्वांनी सहकार्याने पराक्रम करावा व त्याची फळे सहकार्यानेंच भोगावीं. त्यांत विषमता किंवा भेदभाव असू नये. अनंत परमात्मा हा कोठें स्वर्लोकांत, ब्रह्मलोकांत, किंवा वैकुंठांत नसून तो प्रत्येक व्यक्तीच्या ठायींच निवास करतो. जनतेच्या हृदय- मंदिरांत रहाणाऱ्या या परमात्म्याची सेवा हीच खरी भक्ति होय. हीच पूजा होय. हीं व या तऱ्हेचीं सर्व धर्मांची आधारभूत अशी जी तत्त्वें तीं आत्मसात् करूनच लोकसत्ता पुढे चालली आहे. तीनचार हजार वर्षांच्या इतिहासांतून कालाच्या अग्निदिव्यांतून विशुद्ध होऊन निघालेले धर्म, संस्कृति, कला, विज्ञान यांतले ऐहिक उत्कर्षाला उपकारक असे एकहि तत्त्व लोकसत्तेनें झिडकारलेले नाहीं. उलट मोठ्या साक्षेपाने त्यांचा आदर करून त्यांना सांगाती घेऊनच हा नव्या युगाचा धर्म पुढे निघाला आहे; म्हणूनच लोकसत्ता हा सर्व धर्मांचा धर्म होय असे म्हणतात.