पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४८
भारतीय लोकसत्ता

 अथेन्स या नगरीत प्रथम या धर्मतत्त्वाचा जन्म झाला. रोमन लोकांनी त्याचा प्रतिपाळ केला. पुढे अर्वाचीन काळांत ब्रिटनने त्याचें खरें संवर्धन केले आणि आज अमेरिका त्याची जपणूक करीत आहे. आतां यापुढलें कार्य भारताचे आहे. वर सांगितलेल्या सामन्यांत दण्डसत्तेच्या पक्षाला दिवसेंदिवस जी भरती होत आहे, ती पहातां ब्रिटन व अमेरिका आपल्या बळावर ती रस्सी लोकसत्तेच्या दिशेने खेचून नेऊं शकतील असे वाटत नाहीं; आणि त्यांत भारतानें दण्डसत्तेच्या बाजूने कौल दिला तर जगाचे भवितव्य ठरलेलेंच आहे. आतांपर्यंत मानवानें आपली बुद्धि, प्रज्ञा प्रतिभा यांच्या साह्याने जे जे मिळविले त्या सर्वावर विनाशाची घोर आपत्ति कोसळेल.
 भारताच्या हातीं जगाचें भवितव्य आहे असे प्रारंभी म्हटले आहे ते या अर्थानें. जगाला क्रान्तिरेषेच्या कोणच्या दिशेला न्यावयाचे ते आतां आपण भारतीयांनी निश्चित करावयाचे आहे. भारतीयांनी आपला कौल लोकसत्तेच्या बाजूनें दिला आहे असे साधारणपणे म्हणण्यास हरकत नाहीं; पण याचा अर्थ इतकाच की, ही शासन पद्धति हितकारक आहे हे त्यांना पटले आहे. पण या बौद्धिक जाणीवेचे निष्ठेत रूपांतर झाले नाहीं तोपर्यंत याचा कांहीं एक उपयोग नाहीं. मराठेशाहीच्या उत्तर काळांत इंग्रज आपलें राज्य घेरीत चालले होते आणि फितुरीमुळे, आपल्यांतील दुहीमुळे शेवटी आपले राज्य जाणार ही जाणीव प्रत्येक मराठा सरदाराला झाली होती हें त्या वेळच्या कागदपत्रांवरून दिसते. पण या जाणीवेमागें जें निष्ठेचे बळ लागतें तें त्या वेळी आपल्या ठायीं निर्माण झाले नाहीं; म्हणून आपण स्वातंत्र्य गमावून बसलो. आज कालपुरुषानें पुन्हां आपणांस संधि दिली आहे. दण्डायत्त शासनापेक्षां लोकायत्त शासन श्रेष्ठ होय, अशी आपल्या मनाची निश्चिति सुदैवाने झाली आहे; पण त्या निश्चितीमागें जी निष्ठेची पुण्याई लागते, ती आपल्या ठायीं नाहीं. ती कशी निर्माण करता येईल याचे दिग्दर्शन करण्याचा अल्पसा प्रयत्न या ग्रंथांत केला आहे. त्याच्या अभ्यासानें भारतीय तरुणांमध्ये आपली लोकसत्ता दृढ करण्यासाठीं तनमनधन अर्पण करण्याची इच्छा निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करून भारतीय लोकसत्तेचें हें विवेचन संपवितो.