पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४४
भारतीय लोकसत्ता

खडतर व्रत चालू ठेवले पाहिजे. त्यांतच त्यांचे चारित्र्य प्रखर होत जाईल आणि धनशक्तीवर मात करून काँग्रेसचें पुनरुज्जीवन त्यांना करता येईल. ब्रिटिश सरकारशी लढा चालू असतांना आपल्याला कार्य करण्यास वाव आहे की नाहीं या विचाराने त्यावेळचे नेते व कार्यकर्ते आडून बसले नाहींत, तर आत्मबलिदानाचा निश्चय करून त्यांनी आपल्या पराक्रमाला क्षेत्र निर्माण केले. एकामागून एक त्यावेळी मागल्या पिढीचे धुरीण बळी जाऊं लागतांच जनता जागृत झाली व तिच्यांतून एक नवी शक्ति निर्माण झाली. आणि तिच्यापुढे ब्रिटिश सरकारलाहि नमावे लागले. म्हणून तेच धोरण तेथील तमोगुणी शक्तीशी संग्राम करण्याच्या काम नव्या पिढीनें अवलंबिले पाहिजे,
 काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे आग्रहाने सांगण्याचें कारण असे कीं, ती एक फार मोठी पुण्याई आहे. आजचे काँग्रेसचे अनुयायी नीतिभ्रष्ट असले तरी ते म्हणजे काँग्रेस नव्हे. अशा स्थितींतही ते देशाच्या अधिकारपदावर राहूं शकतात तेहि काँग्रेसच्या पूर्वपुण्याईच्या जोरावरच. हें पुण्याईचं सामर्थ्य त्यांच्यामागून काढून आपल्यामागें खेचण्याचें कार्य नव्या नागरिकांनी केले पाहिजे. यामुळे दोन कार्ये साधतील. सध्यांचें भ्रष्ट अधिकारी हतप्रभ होतील व नव्या पिढीला पूर्व संचिताचे बळ प्राप्त होईल. थिओडोर रूझवेल्ट यांनीं रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेचा असाच उपयोग केला. विड्रो विल्सन व फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी डेमाक्रॅटिक पक्षाची पुण्याई अशीच उपयोगांत आणली. १९१४ साल लोकमान्य टिळक तुरुंगांतून सुटून आले तेव्हां काँग्रेसचे नेते अगदीं सरकारधार्जिणे व भीरु वृत्तांचे होते. त्यांच्या हाती सध्यांच्या श्रेष्ठीप्रमाणेच काँग्रेसची सूत्रे होतीं तरी त्याच काँग्रेसमध्ये टिळक शिरले व त्यावेळच्या नेत्यांना आपल्या चारित्र्याच्या बळावर उधळून देऊन त्यांनी काँग्रेस आपल्या ताब्यांत घेतली. हेंच धोरण आपण पुढे चालू ठेविले पाहिजे. नाहींतर फ्रान्ससारखे येथें अनंत पक्ष निर्माण होतील आणि स्थिर शासन निर्माण करणे आपल्याला अशक्य होऊन बसेल. म्हणून मला नव्या पिढीच्या तरुण नागरिकांना अट्टाहासाने असे सांगावेसे वाटते की पंडितजींच्या हांकेला प्रतिसाद देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये शिरावें व आपल्या चारित्र्यबळाने तिला पूर्वीचें उज्जवल रूप प्राप्त करून द्यावे.