पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४३
मानवपुनर्घटना

खाजगी चर्चेत असे मीं सांगितल्यावर माझ्या अनेक मित्रांनी तशी टीकाहि केली. आणि तसे त्यांना वाटू नये, यांतील सयुक्तिकता वाचकांना दिसावी याच उद्देशाने मीं वर अमेरिकेतील थोर पुरुषांनी अवलंबिलेल्या धोरणाचें जरा सविस्तर स्पष्टीकरण केले आहे. अमेरिकेत सध्यां रिपब्लिकन व डेमोक्रॅट हे जे दोन मोठे पक्ष आहेत त्यांच्या तत्त्वांत व आचारांत सध्यां महत्त्वाचा कसलाहि फरक नाही. सन १८०० च्या सुमारास हे पक्षभेद निर्माण झाले त्यावेळी त्यांची तत्त्वे भिन्न होतीं. पण आतां तसा भेद त्यांच्यांत नाहीं. नीति किंवा अनीति, कर्तृत्व वा नालायकी, भांडवली वा राष्ट्रीय किंवा कांहींसे समाजवादी धोरण या सर्व दृष्टींनीं दोन्ही पक्ष व्यवहारतः सारखेच आहेत. आपला जो भ्रष्टतेचा, अनीतीचा विषय चालू आहे त्या दृष्टीने दोन्ही पक्ष सारखेच अधोगामी ठरले आहेत. असे असूनहि रूझवेल्ट, विल्सन या धीर पुरुषांनी त्याच पक्षांच्या संघटनांत शिरून आपल्या चारित्र्यानें त्यांची शुद्धि घडवून आणली. हेच धोरण भारतीय नागरिकांनी स्वीकारावे असे मला वाटते. पंडितजी सध्या तरुणांनी काँग्रेसमध्ये यावे म्हणून साद घालीत आहेत. काँग्रेसच्या अनीतिमुळे, धनवंतांचें तिनें जें दास्य पतकरले आहे त्यामुळे, तिच्या कार्यकर्त्यांत सध्यां ज्या दुफळ्या होत आहेत, जी विघटना चालू आहे त्यांमुळे या संस्थेत आपल्याला वाव नाहीं असे तरुणांना वाटते. आणि तसे वाटणे एकपरीने साहजिकच आहे. पण तसा वाव आहे म्हणून तरुणांनीं, नव्या दमाच्या पिढीनें काँग्रेसमध्ये जावे असे मला म्हणावयाचें नसून रूझवेल्ट विल्सन यांच्याप्रमाणे आंत शिरून तिची शुद्धि करून स्वतःला अवसर प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे माझे सांगणे आहे. ही गोष्ट सोपी नाहीं हें खरें. नवे लोक असें कांहीं करूं लागतांच शिस्तीच्या नांवाखाली काँग्रेसश्रेष्ठी व त्यांच्यामागचे सूत्रधार त्यांना हाकलून देतील यांत शंकाच नाहीं. पण याच वेळी या तरुणांनी संग्राम केला पाहिजे. तो झालेला अन्याय जनतेपुढे मांडून ती शक्ति आपल्यामागें खेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यांत एक बळी जाईल, दुसरा जाईल, अनेक जातील पण या लढ्यांतूनच लोकशक्ति धनवंतांच्याकडून आपल्याकडे खेचण्याचे सामर्थ्य नव्या कार्यकर्त्यांना प्राप्त होईल. मात्र हे करीत असतांना त्यांनी लोकसेवेचे